कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 8 हजार 200 कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्यासाठी निधी देऊन कामेही मंजूर आहेत. विकासकामांच्या वर्कऑर्डरही दिल्या आहेत; मात्र काही विघ्नसंतोषी कामे मंजूर नाहीत, निधी नाही आणि वर्कऑर्डरही नसल्याचे सांगत आहेत. तसे त्यांनी सिद्ध करून दाखवावे, मी लोकसभेला उभारणार नाही, असे आव्हान खा. धैर्यशील माने यांनी दिले.
गुरूदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या माध्यमातून मी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे नारळ कुणी दुसरेच फोडत असल्याची टीका खा. माने यांचे नाव न घेता केली होती. त्यावर खा. माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खा. माने म्हणाले, माजी खा. राजू शेट्टी यांचे आव्हान वाटत नाही. तर मतदारसंघ चांगल्या पद्धतीने उभारण्याचे आव्हान आहे, असे मी मानतो. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून आणलेली ही विकासकामे आहेत. म्हणूनच मी तीन महिन्यांपूर्वी त्यासंदर्भातील निधी मंजुरीचे फलक लावले होते, असे खा. माने यांनी सांगितले.