Latest

धाराशिव : पावसाअभावी दुष्काळछाया गडद; कोवळी पिके कोमेजू लागली, उत्पादन घटणार

निलेश पोतदार

धाराशिव ; शंकर बिराजदार तालुक्यात मागील २५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पाण्याअभावी खरीपाची पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतातील कोवळी पिके कोमेजून जात आहेत. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. दमदार पाऊस न झाल्यामुळे पीक वाया जाण्या बरोबरच उत्पादनातही मोठी घट येणे अटळ आहे. तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे.

तालुक्यात वाडी, वस्ती, तांड्यासह ९६ गावे तर उमरगा व मुरूम हि दोन शहरे आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्यात २ लाख ६९ हजार ५१९ इतकी लोकसंख्या असून, यात पुरूष १ लाख ३८ हजार २९० तर १ लाख ३१ हजार २२९ महिलांचा समावेश आहे. ५८ हजार ५० शेतकरी संख्या असून, यात ४६ हजार ६६५ अल्प भूधारक, ११ हजार ८८९ अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. तालुक्याची वार्षिक ७९९ मिमी पावसाची सरासरी आहे. शेती हि पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तालुक्यात तीन मध्यम प्रकल्पासह ३१ लघू व साठवण तलाव आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे खात्रीशीर उत्पादन मिळण्याची शाश्वती नसते. सिंचन सुविधा मुबलक नसल्याने या क्षेत्रातून अधिक उत्पादन घेता येत नाही. तालुक्याची ७९९ मीमी पावसाची वार्षीक सरासरी आहे. तालुक्यात यावर्षी पावसाचे जवळपास एक महिना उशीरा आगमन झाले. जमीनीत पुरेशी ओल झाल्यानंतर जुलै मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने खरिप पेरणी केली. सध्या पिके फुल धारणा अवस्थेत आहेत. मात्र गेल्या पंचवीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने फुल गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ६८ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे उत्पादनातील घट अटळ असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.

तालुक्यात आतापर्यंत ५६५.०५ मीमी पाऊस अपेक्षित असताना केवळ ३१७.०४ मीमी ईतका पाऊस झाला आहे. आतापर्यंत कोळसूर लघू पाटबंधारे साठवण तलाव शंभर टक्‍के भरला आहे. जकापूर, बैन्नीतूरा व तुरोरी या मध्यम प्रकल्पात २५% दलमीच्यावर पाणी साठा उपलब्ध आहे. तर केसजवळगा क्रमांक एक व दोन या तलावात ३०% च्या वर पाणीसाठा आहे. तीन तलाव कोरडेठाक पडले आहेत. दहा तलावात शून्य टक्के पाणी साठा आहे. अकरा तलावात दहा टक्केच्या खाली पाणी साठा शिल्लक आहे. तर पाच तलावात पाच टक्क्यांच्यावर पाणी साठा उपलब्ध आहे. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस पडला नाही तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होवून जनावरांच्या चारा पाण्याचा व भीषण पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होणार आहे.

खरीप हंगाम अंतीम पेरणी!

पिक सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
भात- ६४० १५ २.३४
ख. ज्वारी- २५५० ८५ ३.३३
बाजरी- २८८९.६८ ४७८ १६.५४
मका- १०७४.३२ २४० २२.३४
इ तृणधान्य- २०५.६० ३५ १७.०२
तुर- १६६६३.९५ ७७६५ ४६.६०
मुग- ४१२६.३० १५३२ ३७.१३
उडीद- ८७५२.८८ २७३३ ३१.२२
तिळ- ३५८.८५ ३७ १०.३१
इ कडधान्य- २९२ ४० १३.७०
भुईमुग- ८१८.३२ ८४ १०.२६
खुरासणी- ३९८.४८ ०९ २.२६
सुर्यफुल- ८४९.५१ – –
सोयाबीन-३५,२०० ६४,६८५ १८३.७६
इ गळीत धान्य- २३३.४० – –
एकुण- ७५,०५४.२९ ७७,७३८ १०३.५८
____________
तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र!
तालुक्यात ९६ गावातील एकूण ९८ हजार ६८२ हेक्टर इतके भौगोलिक क्षेत्र आहे. यापैकी ८७ हजार २४४ हेक्टर इतके क्षेत्र लागवडी योग्य आहे. यात खरिप ७९ हजार ६७७.४१ हेक्टर, रब्बी ४१ हजार ४१५ हेक्टर, उन्हाळी पिके १९६.०६ हेक्टर, सिंचित १० हजार १९२ हेक्टर, पडित १ हजार ६१० हेक्टर, वनक्षेत्र ८६३ हेक्टर आहे. तर उर्वरित अंदाजे ९८७.३६ हेक्टर क्षेत्र फळपिकाखाली आहे.
____________

खरिप पेरणीनंतर पिकाची चांगली वाढ झाली. सध्या पिक फुलं अवस्थेत आहेत. मात्र तीन आठवडे झाले पाऊस नसल्यामुळे पिके करपू लागली आहेत. जनावरांना शिवारात कोठेही पाणी व चारा नाही. दोन दिवसात दमदार पाऊस पडला नाही तर जनावरे विक्री शिवाय पर्याय नाही. शासनाने तातडीने शेतकर्‍यांचे समुपदेशन आर्थिक मदतीसह उपाययोजना करावी.
-रघुनाथ मुळजे, शेतकरी.
____________

शेतकऱ्यांनी संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास तुषार सिंचनाचा वापर करून पिकांना पाणी द्यावे. जी पिके फुलोऱ्यात आहेत व कीड दिसत असेल तर एमामेक्टिन बेनझोट फवारणी करावी. तसेच फुलोरा अवस्थेत नसलेल्या पिकांना १३:०:४५ एक टक्का द्रावणाची फवारणी करावी.
– सागर बारवकर,
तालुका कृषी अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT