धाराशिव अर्थात उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे. तर तोडीसतोड उमेदवारी देण्याचे जाहीर करणारी महायुती अंतर्गत चर्चा व बैठकांतच मग्न असल्याचे चित्र आहे. उमेदवार ठरवताना व जागा पदरात पाडून घेण्यासाठी तिन्ही पक्षांनी सुरुवातीपासूनच घेतलेले बैठकांचे सत्र व दबावतंत्र पाहता महायुतीची दमछाक होत असल्याची चर्चा रंगली आहे.
मागील दोन दशके राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशा लढतीची पंरपरा असलेल्या या मतदार संघावर पूर्वी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. 1996 पासून ही परंपरा खंडित झाली. काँग्रेसला पराभूत करीत शिवसेनेने येथे विजय मिळविला. तर 1998 मध्ये पुन्हा काँग्रेसने बाजी मारली. अर्थात, काँग्रेससाठी हा विजय शेवटचा ठरला. त्यानंतर शिवसेनेने या मतदार संघावर मांड ठोकली. 1999 मध्ये शिवाजी कांबळे, 2004 मध्ये कल्पना नरहिरे यांनी विजय मिळविला. तर 2009 मध्ये डॉ. पद्मसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळवित परंपरा खंडित केली. त्यानंतर 2014 मध्ये शिवसेना पुन्हा प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या रूपाने विजयी झाली. तर 2019 मध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शिवसेनेकडे हा मतदारसंघ कायम राखला. मागील दोन वर्षांत शिवसेना व राष्ट्रवादी फुटीमुळे समीकरणे बदलली आहेत. कालचे शत्रू आज मित्र झाले आहेत. तर मित्रांचे रुपांतर शत्रूत झाले आहे.
खा. राजेनिंबाळकर यांचा जनसंपर्क असल्याने मतदार संघावर त्यांची छाप आहे. त्यामुळे त्यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याचा निर्धार दोन महिन्यांपूर्वीच महायुतीने केला होता. त्यात शिंदे शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत, भाजपचे आ. राणा जगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रा. सुरेश बिराजदार, माजी खा. प्रा. गायकवाड यांनी खा. राजेनिंबाळकरांना पराभूत करण्याचा प्लॅन आपल्याकडे असल्याचे सांगत योग्यवेळी उमेदवार जाहीर करू, पक्ष कोणता का असेना असे सांगत शड्डू ठोकला होता. प्रत्यक्षात दोन महिने झाले, तरी महायुतीत जागा कोणत्या पक्षाला सुटणार, यावर एकमत होऊ शकलेले नाही. दोन दिवसांपूर्वी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपकडून इच्छुक असलेल्या नेत्यांचा हिरमोड झाला आहे.
आ. पाटील, प्रवीणसिंह परदेशी, आ. अभिमन्यू पवार या भाजप नेत्यांची नावे चर्चेत होती. प्रत्यक्षात ती मागे पडली. शिवसेनेकडून पालकमंत्री सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत इच्छुक होते. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रा. सुरेश बिराजदार यांनी तयारी केली आहे. प्रत्यक्षात निवडणूकपूर्व सर्वेक्षणांचा आधार घेत भाजपने तगडा उमेदवार देण्याचा निर्धार केला. त्यानंतर आणखी नवीन नावांची भर पडली आहे. यात राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य विक्रम काळे यांच्या नावाचा विचार केला. त्यात त्यांनीही नकार दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पक्षाने आता आ. पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ. अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीकडून मैदानात उतरविण्याचा विचार केल्याचे सांगितले जात आहे. त्या अनुषंगाने चाचपणी सुरू आहे. कदाचित सर्व समीकरणे जुळून आली, तर सौ. पाटील याच नात्याने चुलत दीर असलेल्या ओमराजेंना आव्हान देतील, अशी चिन्हे आहेत. त्यांनी नकार दिलाच तर मात्र आ. काळे किंवा प्रा. सुरेश बिराजदार अथवा राष्ट्रवादीच्या चिन्हावर प्रवीण परदेशी असे पर्याय सध्या तरी दिसत आहेत. खा. राजेनिंबाळकरांची प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ तीन जिल्ह्यात विखुरला आहे. धाराशिव जिल्ह्यातील चार, लातूर व सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा सहा मतदार संघांचा विस्तार 11 तालुक्यांत आहे. जिल्ह्याचे नामांतर झाले असले, तरी आगामी पुनर्रचनेपर्यंत उस्मानाबाद मतदार संघाचे नाव कायम राहणार आहे. या मतदार संघात 20 लाख 4 हजार मतदार आहेत. महिला मतदार 9 लाख 46 हजार असून, पुरुष मतदार 10 लाख 58 हजार आहेत. नवमतदार 86 हजार आहेत.