पुढारी ऑनलाईन डेस्क : Kuldeep Yadav Record : धर्मशाला येथे भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंड संघाची फलंदाजी उद्ध्वस्त केली. पाहुण्या संघाचा पहिला अवघ्या 57.4 षटकांत 218 धावांतच गारद झाला. या सामन्यात कुलदीप यादवने विकेट्सचा पंच लगावला, तर शंभरावी कसोटी खेळत असलेल्या रविचंद्रन अश्विननेही चार विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाला एक बळी मिळाला. एकेकाळी इंग्लंडचा संघ सामन्याच्या पहिल्या दिवशी जोरदार फॉर्ममध्ये दिसत होता. पण त्यानंतर त्यांनी अवघ्या 8 धावांतच 5 विकेट्स गमावून तंबू गाठला.
कुलदीप यादवने टीम इंडियासाठी शानदार गोलंदाजी करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला. गेल्या 100 वर्षात सर्वात कमी चेंडू टाकून 50 विकेट्स घेण्याच्या बाबतीत कुलदीप पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. भारतीय गोलंदाजांच्या यादीतही त्याने अव्वल स्थान गाठले. कुलदीपने 1871 चेंडू टाकून 50 बळी पूर्ण केले आहेत. (Kuldeep Yadav Record)
100 वा कसोटी सामना खेळत असलेला जॉनी बेअरस्टो हा कुलदीपचा अर्धशतकी बळी ठरला. विकेटच्या ध्रुव जुरेलने बेअरस्टोचा झेल पकडला. कुलदीपच्या आधी भारतासाठी अक्षर पटेलने कसोटी क्रिकेटमध्ये 2205 चेंडूत तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 2465 चेंडूत 50 बळी पूर्ण केले होते. याशिवाय तिन्ही फॉरमॅटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा तो भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी भारतासाठी हा पराक्रम केला आहे. (Kuldeep Yadav Record)
कुलदीपची आतापर्यंतची कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 2017 मध्ये धर्मशालेच्या मैदानावर कसोटी पदार्पण केले होते. योगायोग म्हणजे याच मैदानावर त्याने बळींचे अर्धशतक पूर्ण केले. 12 सामन्यांच्या 21 डावात त्याच्या नावावर 51 विकेट्स जमा झाल्या आहेत. 40 धावांत 5 बळी ही त्याची एका डावातील, तर संपूर्ण सामन्यात 113 धावांत 8 बळी हे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. त्याचा इकॉनॉमी रेट 3.44, तर सरासरी 21.02 आहे. कुलदीपने कसोटीत 4 वेळा पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे.
भारतासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची यादी पाहिली तर कुलदीप 43व्या क्रमांकावर आहे. या बाबतीत अनिल कुंबळे आघाडीवर आहे. कुंबळेने 132 कसोटी सामन्यात 619 विकेट घेतल्या आहेत. तर रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनने 100 सामन्यांत 507 बळी घेतले आहेत. कपिल देव तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याने 131 सामन्यात 434 विकेट घेतल्या आहेत.