Latest

आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करा; हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर धनगर समाजाचा मोर्चा

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाचे अनुसूचित जमाती आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करा, या मुख्य मागणीसह इतरही मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम येथून धनगर समाजाचा भव्य मोर्चा हिवाळी अधिवेशना दरम्यान काढण्यात आला. आज (दि. ११) धनगर समाजाच्या मोर्चा व्यतिरिक्त प्रदेश काँग्रेसचा हल्लाबोल, विदर्भ राज्य जनआंदोलन समितीसह सुमारे 14 मोर्चांनी विधानभवनावर धडक दिली.

राज्यभरातून हजारो धनगर समाज बांधव आज या मोर्चात सहभागी झाले होते. 'पिवळा झेंडा फडकला, धनगर आता भडकला' या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आमच्या हक्काचे आरक्षण व मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास सरकार खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यानिमित्ताने देण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव आक्रमक होते. यानिमित्ताने मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्याप्रमाणेच राज्य सरकारच्या विरोधात मोठा संताप दिसत होता. विशेष म्हणजे हा मोर्चा कुण्या आमदार, खासदारांच्या नेतृत्त्वात नाही. तर संपूर्ण समाज बांधवांचा आहे असे सांगत सर्वपक्षीय राजकारण्यांवर समाज बांधवांनी या मोर्चात तीव्र नाराजी व्यक्त केली. धनगर समाजातील विविध संघटना यात सहभागी झाल्याने मोर्चाला विशाल स्वरुप प्राप्त झाले होते. पुरुषोत्तम डाखोळे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला संबोधित केले. माजी खासदार डॉ विकास महात्मे, आ गोपीचंद पडलकर सहभागी झाले होते.

लक्षवेधी प्रमुख मागण्या

  • धनगर समाजाचे अनुसूचित जमाती आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करा.
  • धनगर मेंढपापाळाच्या चराई क्षेत्र व इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करा.
  • अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यानगर तत्काळ करा.
  • धनगर समाजासाठी एक हजार कोटीच्या बजेटची अंमलबजावणी तातडीने करा.

विदर्भ राज्यासाठी धडकला मोर्चा

स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती व्हावी या मुख्य मागणीसाठी विदर्भ जॉइंट अ‍ॅक्शन कमेटीचा मोर्चा सोमवारी विधानभवनावर धडकला. या मोर्चामध्ये डॉ श्रीनिवास खांदेवाले,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, प्रभाकर कोंडबटूनवर, चंद्रशेखर बदुकले, बाबा शेळके, जावेश पाशा, अहमद कादर यांच्यासह अनेक विदर्भवादी सहभागी झाले होते.

लक्षवेधीप्रमुख मागण्या

  • वेगळे राज्य झाल्यास विदर्भातील ११ जिल्ह्यांचा विकास आराखाडा स्वतंत्रपणे राबविता येईल
  • वीज निर्मिती प्रकल्प अधिक असल्यामुळे १४ तास वीजपुरवठा शक्य
  • रोजगाराची मोठी प्रक्रिया विदर्भ राज्यात निर्माण करता येईल
  • राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भावर होणाऱ्या अन्यायाला पूर्णविराम मिळेल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT