पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेचा मधल्या फळीतील फलंदाज धनंजय डी सिल्वाने पाकिस्तानविरुद्ध गालेच्या मैदानावर दमदार शतक झळकावले. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यातील शतकी खेळीमुळे श्रीलंकेच्या संघाला दिलासा मिळाला असून पाकिस्तान संघाच्या अडचणी वाढवल्या आहेत. बुधवारी दुसऱ्या कसोटीत लंकेने 8 बाद 360 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला आणि पाकिस्तानला विजयासाठी 508 धावांचे मोठे लक्ष्य दिले. एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करून सामना जिंकेल काय याकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे. 2003 मध्ये अँटिग्वा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 418 धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. (SL vs PAK Test)
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेला दुसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक टप्प्यात पोहचला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने जिंकला. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा संघ विजयाच्या वाटेवर आहे. श्रीलंकेचा फलंदाज धनंजया डी सिल्वाने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले. डी सिल्वाच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य ठेवले. श्रीलंकेचा उजव्या हाताचा या फलंदाजाने 171 चेंडूत 16 चौकारांच्या मदतीने 109 धावा फटकावल्या. त्याचे हे 9वे कसोटी शतक आहे. डी सिल्वा आणि रमेश मेंडीस यांनी आठव्या विकेटसाठी 82 धावांची भागिदारी केली. रमेश 45 धावांवर नाबाद राहिला. तर शतक पूर्ण केल्यानंतर डी सिल्वा अवघ्या नऊ धावांची भर घालून तंबूत परतला. (SL vs PAK Test)
श्रीलंकेला दुसऱ्या डावात स्वस्तात गुंडाळण्यात पाकिस्तानचे गोलंदाज अपयशी ठरले. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. दुसरीकडे यासिर शाह, नौमान अली आणि आगा सलमान यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. नसीम शाहने 12.5 षटके टाकली, ज्यात त्याने 44 धावांत 2 बळी घेतले. दुसरीकडे, मोहम्मद नवाजने 21 षटकांत 75 धावा देत 2 बळी घेतले.
तत्पूर्वी श्रीलंका संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत श्रीलंकेच्या संघाने पहिल्या डावात 378 धावा केल्या. ज्यामध्ये दिनेश चंडिमल, निरोशन डिकवेला आणि ओशादा फर्नांडो यांनी अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव 231 धावांत आटोपला आणि पहिल्या डावाच्या जोरावर श्रीलंकेला 147 धावांची मोलाची आघाडी मिळाली. (SL vs PAK Test)
श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात कर्णधार दिमुथ करुणारत्ने सलामीला येता आले नाही. अशा स्थितीत संघाला पहिला धक्का लवकर बसला आणि त्यानंतर संघाने 59 धावांत तीन गडी गमावले. तर 100 धावांत चार विकेट पडल्या होत्या. यानंतर कर्णधार दिमुथ करुणारत्ने मैदानात उतरला आणि त्याने धनंजय डी सिल्वासोबत सहाव्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. करुणारत्ने 61 धावांवर बाद झाला, पण डी सिल्वाने शतक ठोकले. पाकिस्तानला आता मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. (SL vs PAK Test)