Latest

पुणे : देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला ; माय- लेकाचा दुर्दैवी मृत्यू

अमृता चौगुले

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून वडगांव रासाई (ता. शिरूर) येथील माय-लेकाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. इतर भाविक या अपघातात जखमी झाले आहेत. हा अपघात सातारा जिल्ह्यातील खंडाळा जवळ पारगाव परिसरात घडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव रासाई येथील भाविक देवदर्शनासाठी काळूबाईला गेले होते. माघारी परतत असताना त्यांचे वाहन सातारा जिल्ह्यातील खंडाळा जवळ आले असताना ट्रकवर जाऊन मागून आदळले. यावेळी कारमधील कांचन चंद्रकांत वनशिवे (वय ३०, वडगाव रासाई, ता. शिरुर), विरेंद्र चंद्रकांत वनशिवे (वय १०) हे दोघे जागीच ठार झाले तर कारमधील संकेत भिमाजी चौधरी (वय २२, रा. वडगाव रासाई, ता. शिरुर), स्नेहल पांडुरंग कुलथे (वय ४३, रा. वडगांव रासाई), अनिल मुक्ताराम कुलथे (वय ५५, रा. वडगांव रासाई),अंजली अनिल कुलथे (वय ५०, रा. वडगांव रासाई ), परी अनिल कुलथे (वय ७) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहे. अपघात घडल्याचे कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

अपघाताची माहिती वडगांव रासाई परिसरात कळताच दुःखाचा डोंगर कोसळला. या अपघातात मयत झालेल्या कांचन वणशिवे यांच्या सहा वर्षाच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. या धक्क्यातून त्या सावरत असतानाच पुन्हा त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या अपघातात काळाने त्यांच्यासह त्यांच्या मुलालाही हिरावून नेले. याबाबत अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. जखमींवर उपचार सुरू असून मृत्युमुखी पडलेल्या आई व मुलावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

SCROLL FOR NEXT