Latest

अक्कलकोटहून निघालेली भाविकांची चारचाकी औट्रम घाटात दरीत कोसळली, दुर्घटनेत ४ ठार, ७ जखमी

backup backup

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : चाळीसगावच्या हद्दीत अक्कलकोटहून देवदर्शन घेऊन परत निघालेल्या गाडीचा कन्नड औट्रम घाटात (दि.२६) रात्री भीषण अपघात झाला. धुक्याचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे तवेरा गाडी थेट दरीत कोसळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवासी अक्कलकोट येथून दर्शन घेऊन मालेगावकडे प्रवास जात होते. जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे औट्रम घाटात धुके पसरले होते. त्यातच अंधार आणि धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने अक्कलकोट येथून दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविकांची कार दरीत कोसळली. या अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला, एक ८ वर्षांची मुलगी आणि एका पुरूषाचा समावेश आहे. दरीत कोसळलेल्या या कारचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

या अपघातामध्ये प्रकाश गुलाबराव शिर्के (65), शिलाबाई प्रकाश शिर्के, (60), वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (35), पूर्वा गणेश देशमुख ( 8) अशी अपघात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (20), जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी (20), सिद्धश पुरुषोत्तम पवार, (12), कृष्णा वासुदेव शिर्के (4), रूपाली गणेश देशमुख (30), पुष्पा पुरूषोत्तम पवार (35), वाहन चालक अभय पोपटराव जैन (50) अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत.

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी रेस्क्यू अभियान राबवून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव येथील काही भाविक हे अक्कलकोट येथे तवेरा गाडीने दर्शनासाठी गेले होते. यावेळी दर्शन घेऊन मालेगावकडे ते परतत असताना हा अपघात झाला. चाळीसगाव येथील कन्नड घाटात मोठ्या प्रमाणात धुके तसेच अंधार होता, यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी कन्नड घाटातील दरीत कोसळली असल्याची माहिती देण्यात आली.

SCROLL FOR NEXT