Latest

राज्यातील बंदीजनांना मिळणार रेशीम उद्योगाचे धडे

अमृता चौगुले

शिवाजी शिंदे

पुणे : कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांना (कच्चे कैदी) शिक्षा पूर्ण झाल्यावर त्यांना समाजात पुन्हा उभा राहता यावे, यासाठी 'रेशीम उद्योग' सुरू करण्यासाठी प्रशिक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्याच्या रेशीम उद्योग विभागाने पुढाकार घेतला आहे. ही योजना प्रत्यक्षात राबविण्यासाठी कारागृहाचे अधिकारी यांच्याशी चर्चा सुरू असून, लवकरच हा उपक्रम राज्यातील कारागृहात सुरू होणार आहे.

राज्यात तुती लागवडीचा हंगाम जून ते सप्टेंबर आहे. त्याच्या अगोदर बंदीजणांना तुतीच्या बियाण्यांपासून कलमे तयार करणे, कलमांवर रासायनिक प्रक्रिया करणे, कलमे लावण्यासाठी गादी वाफे तयार करणे आणि प्रत्यक्षात कलमांची गादी वाफ्यांवर लागवड कशी करावी याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर तुती लागवडीच्या कालावधीत कलमे रोपांच्या स्वरूपात तयार होतील त्याची शेतजमिनीमध्ये पट्टा पद्धतीने लागवड कशी करतात याचे प्रात्यक्षिक अधिकारी जागेवरच प्रशिक्षण देतील.

तुतीच्या लागवडीबरोबरच तुतीच्या बागेचे व्यवस्थापन, वेळोवेळी औषधांची फवारणी याची माहिती, चार ते पाच महिन्यांत बाग वाढल्यानंतर रेशीम कीटकांच्या संगोपणाबाबत प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्षात या रेशीमांची बाजारपेठेत कशी विक्री होते. त्यांला भाव कसा मिळतो, याचीही माहिती अधिकार्‍यामार्फत देण्याचे नियोजन केले आहे.

  • शिक्षा संपल्यानंतर सुरू करता येणार रोजगार
  • कारागृहाच्या जमिनीवर प्रयोग
  • कारागृहासदेखील उत्पादनाचा स्रोत मिळणार
  • रेशीम किटकांचे संगोपन

कारागृहात शिक्षा भोगत असलेले बंदीजन (कच्चे कौदी) यांना रेशीम कोष तयार करण्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर हे कैदी शिक्षा संपल्यानंतर गावी जातील, त्यांना त्यांच्या शेतीमध्ये किंवा इतर ठिकाणी रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना शेतीमध्ये हा उद्योग सुरू करता येऊ शकतो. त्यामुळे त्यांना अर्थाजन प्रारप्त होऊ शकते हा एक पर्याय उपलब्ध होणार आहे.
                            – संजय फुले, अधिकारी, जिल्हा रेशीम विभाग -पुणे

SCROLL FOR NEXT