Latest

मराठा आरक्षण, हद्दवाढप्रश्नी उपमुख्यमंत्री पवार उद्या बैठक घेणार

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणप्रश्नी मंगळवारी (दि. 15) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. याबरोबरच कोल्हापूर हद्दवाढ आणि कोल्हापूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक नियुक्तीबाबतही बैठक होणार असल्याचे सकल मराठा समाजाचे अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी सांगितले.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाने एल्गार पुकारला आहे. 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापूर हद्दवाढीचा प्रश्न कायम आहे. कोल्हापूरला कोणी राजकीय वालीच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने महापालिकेची एकदाही हद्दवाढ झालेली नाही.

हद्दवाढीअभावी शहराची अक्षरश: घुसमट सुरू असून विकासापासून  वंचित राहण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. कोल्हापूरसारख्या महत्त्वाच्या शहरासाठी राज्य शासनाला अद्याप आयुक्त म्हणून एकही अधिकारी मिळत नाही. पूर्णवेळ आयुक्त नसल्याने शहराच्या विकासावर परिणाम होत आहे. या सर्व बाबींवर शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमनिमित्त कोल्हापुरात येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घ्यावी, अशी लेखी मागणी सकल मराठा समाजाने केली होती.

या मागणीनुसार मंगळवारी (दि. 15) सकाळी साडेदहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार असल्याचे उपमुख्यमंत्री कार्यालयातून कळवण्यात आले आहे. मात्र, सोमवारी बैठकीची नेमकी वेळ निश्चित होईल. त्यानुसार बैठकीचे पत्र उपलब्ध होईल, असे अ‍ॅड. इंदुलकर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT