Latest

एकाच जीन मॉड्युलमधून येतात डिप्रेशन, हृदयविकार

Arun Patil

लंडन : भारतीय वंशाच्या एका संशोधक महिलेने आता डिप्रेशन (नैराश्य) आणि हृदयरोग (सीबीडी) यांच्यामधील दीर्घकाळापासून अनुमानित असलेल्या संबंधांबाबत महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यामध्ये असे दिसून आले की, डिप्रेशन आणि हृदयविकार हे आंशिक रूपाने एकाच जीन मॉड्युलमधून विकसित होतात.

1990 च्या दशकापासूनच हे अनुमान लावले जात होते की, दोन्ही आजार एकमेकांशी संबंधित आहेत. जगभरातील सुमारे 280 दशलक्ष लोक डिप्रेशनने ग्रस्त आहेत, तर 620 दशलक्ष लोक सीबीडीने ग्रस्त आहेत. फिनलँड विद्यापीठातील संशोधकांनी या दोन्हीमधील संबंध जाणून घेण्यासाठी रक्त जनुकांचे विश्लेषण केले. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'फ्रंटियर्स इन सायकाईट्री' नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या संशोधनाच्या निष्कर्षांवरून दिसून येते की, डिप्रेशन आणि सीबीडीमध्ये किमान एक कार्यात्मक 'जीन मॉड्युल' समान आहे. हे संशोधन डिप्रेशन आणि सीबीडीसाठी नव्या मार्करांची ओळख करण्याबरोबरच दोन्ही आजारांना डोळ्यांसमोर ठेवून औषधे विकसित करण्यासाठी मदत करू शकते. जीन मॉड्युलला वेगवेगळ्या स्थितींमध्ये समान अभिव्यक्ती पॅटर्न असलेल्या जनुकांच्या समूहाच्या रूपात परिभाषित केले जाऊ शकते आणि त्यासाठी कार्यात्मक रूपाने संबंधित होण्याची शक्यता आहे.

फिनलँडमधील टाम्परे विद्यापीठातील संशोधिका बिनिशा एच. मिश्रा यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले, आम्ही डिप्रेशन आणि सीबीडीग्रस्त लोकांच्या रक्तामध्ये जीन अभिव्यक्ती प्रोफाईल पाहिले आणि एक जीन मॉड्युलमध्ये 256 जनुके आढळली. त्यांची अभिव्यक्ती सरासरीपेक्षा अधिक किंवा कमी स्तरावर लोकांमध्ये दोन्ही आजारांची अधिक जोखीम निर्माण करते. या टीमने 34 ते 49 वर्षे वयाच्या 899 स्त्री-पुरुषांच्या रक्तामधील जीन अभिव्यक्ती डेटाचे अध्ययन करून याबाबतचे निष्कर्ष काढले.

SCROLL FOR NEXT