Latest

Dense Fog in Delhi : दाट धुक्यामुळे १०० हून अधिक उड्डाणे प्रभावित, रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Dense Fog in Delhi : राजधानी दिल्लीला दाट धुक्याने वेढले आहे. दृश्यमानता सुमारे ५० मीटरपर्यंत कमी झाली असून आणखी दोन दिवस ही परिस्थिती राहू शकते. कमी दृश्यमानता आणि दाट धुक्यांमुळे दिल्लीतून उड्डाण करणाऱ्या आणि दिल्लीत येणाऱ्या विमानसेवेवर परिणाम झाला आहे. १०० हून अधिक उड्डाणे यामुळे प्रभावित झाली आहेत. दाट धुक्यामुळे दिल्लीसह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये रेल्वे, रस्ते, हवाई वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पुढचे दोन दिवस दिल्लीतील दृश्यमानता ५० मीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बुधवारी किमान तापमान ७ अंश सेल्सिअस होते. वाढलेल्या धुक्यामुळे दिल्ली रेल्वे स्थानकांवर येण्याऱ्या जवळपास २५ गाड्या उशिराने धावत आहेत. तर दिल्ली विमानतळावरील माहिती दर्शक प्रणालीनुसार, दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावर १०० हून अधिक उड्डाणे प्रभावित झाली आहेत.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारातील दिल्लीत येत असलेल्या आणि दिल्लीतून बाहेर जात असलेल्या उड्डाणांवर परिणाम होत आहे. बुधवारी २८ बाहेर जाणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे, १५ बाहेरून येणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे, ४२ देशांतर्गत बाहेर जाणारी उड्डाणे आणि २५ देशांतर्गत दिल्लीत य़ेणारी उड्डाणे प्रभावित झाली आहेत. दिल्ली विमानतळ प्राधिकरणाने उड्डाणांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रवाशांनी त्यांच्या उड्डाणाच्या माहितीसाठी संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधावा असे यात सांगितले आहे. तसेच विमानतळ प्राधिकरणाने धुके विरोधी लँडिंग यंत्रणा सुरू केली आहे.

दाट धुक्यामुळे दिल्लीमधील हवेचा दर्जा पुन्हा खालावला आहे. बुधवारी हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० च्या पुढे होता. या श्रेणीतील हवा अतिशय खराब मानली जाते. याचा परिणाम दिल्लीकरांच्या आरोग्यावर होऊ शकतो असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, मंगळवारीही धुके वाढल्याने विमान उड्डाणांवर आणि रेल्वे गाड्या धावण्याच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्याचे पहायला मिळाले. सकाळी दाट धुक्यामुळे दृष्यमानता घटल्याने पाच विमानांना उतरविण्यात अडथळे आल्याने या विमानांना अन्यत्र वळवावे लागले होते. तर, जवळपास ३० विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला होता. उत्तर भारतात १४ रेल्वे गाड्या देखील दाट धुक्यामुळे विलंबाने धावल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT