Latest

Chatrapati Shivaji Maharaj Statue : दिल्ली-मुंबई महामार्गावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळा उभारणीचे दिल्लीकर मराठी बांधवांचे निवेदन

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय राजधानी दिल्लीला देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई सोबत जोडणाऱ्या दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याची मागणी जोर धरत आहे. दिल्लीकर मराठी बांधवांनी यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवत लवकरच महाराजांचा पुतळा उभारण्याची प्रक्रिया सुरू करू, असे आश्वासन दिल्याचे कळतेय. पुढील आठवड्यात यासंदर्भात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहेर भेट घेत या मुद्द्यावर चर्चा करतील,अशी माहिती गुरुग्राम येथील महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी विष्णू पाटील,शांताराम उदागे यांनी दिली.

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गुरूग्राम येथील सोहना परिसरातून हा महामार्ग सुरू होतो. याठिकाणी छत्रपतींचा १० ते १२ फूट उंच अश्वारुढ पुतळा उभारण्याची मागणी मराठीबांधवांची आहे. या पुतळ्यासाठीच्या जागेसंंबंधी परिवहन मंत्रालयासोबत चर्चा केल्यास हा मुद्दा मार्गी लागू शकतो, असे मराठी बांधवांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.शिंदे यांनी तत्काळ स्वीय सहाय्यकांना हरियाणा सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले.जागा उपलब्ध झाल्यानंतर पुतळा तसेच परिसराचे सौदर्यीकरण महाराष्ट्र सरकार करेल,अशी ग्वाही देखील शिंदेंनी दिली. आठवड्याभरात छत्रपतींच्या पुतळ्यासंबंधी सकारात्मक निर्णय होईल,अशी माहिती उदागे यांनी दिली.

SCROLL FOR NEXT