Latest

October Heat : ‘ऑक्टोबर हिट’मुळे विजेची मागणी वाढली

Arun Patil

कोल्हापूर : राज्यात यंदा कमी झालेल्या पावसाने ऑक्टोबरमध्ये उकाड्याने हैराण होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महावितरण तारेवरची कसरत करून मागणी आणि पुरवठ्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या राज्याची विजेची मागणी 26 हजार मेगावॅटच्या घरात पोहोचली आहे; तर उपलब्ध वीजही तेवढीच असल्याने अधिक मागणी वाढल्यास भारनियमनाचा धोका आहे.

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यात अनेक भागात दुष्काळसद़ृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विजेच्या मागणी आणि पुरवठ्यावरही कमी पावसाचा परिणाम होत आहे. 'ऑक्टोबर हिट' वाढल्याने घरगुतीसह विविध वर्गवारीतील ग्राहकांचा वीज वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कृषी पंपांचाही वीज वापर वाढत आहे.

सर्वसाधारण ऑक्टोबरच्या शेवटच्या टप्प्यात 25 हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडणारा वीज वापर ऑक्टोबरच्या मध्यावरच सुमारे 26 हजार मेगावॅटच्या घरात पोहोचला आहे. सोमवारी रात्री राज्यात 25 हजार 903 मेगावॅट विजेची मागणी नोंद झाली.

राज्यात सध्या महानिर्मितीची 6 हजार 361 मेगावॅट तर खासगी क्षेत्रातून 6 हजार 564 मेगावॅट वीज उत्पादन आहे. केंद्रीय कोट्यातून राज्यास 11 हजार 547 मेगावॅट वीज मिळते. अशी एकूण राज्यात सध्या 25 हजार 904 मेगावॅट वीज उपलब्ध आहे. मागणी आणि पुरवठ्याचा आकडा पाहील्यास अत्यंत जेमतेम वीज उपलब्ध आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा प्रभाव वाढून वीज मागणीत वाढ झाल्यास भारनियमनाचा धोका आहे.

जिल्ह्याची मागणी हजार मेगावॅट

कोल्हापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. एक ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील 764 मेगावॅट असणारी विजेची मागणी आता 988 मेगावॅटवर पोहोचली आहे. तसेच कृषी पंपांचाही वीज वापर वाढला असून एक ऑक्टोबर रोजी असणारा कृषी पंपाचा 90 मेगावॅट वीज वापर 15 रोजी 404 मेगावॅटवर पोहोचला आहे.

SCROLL FOR NEXT