Latest

delhi vs chennai : कोणाला मिळणार थेट एन्ट्री?

Arun Patil

दुबई ; वृत्तसंस्था : (delhi vs chennai)चेन्नई सुपर किंग्जचा सामना पहिल्या क्वॉलिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. दिल्ली 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी होता. यावरून त्यांच्या कामगिरीतील सातत्यपणा दिसून येतो. चेन्नईने गेल्यावर्षीच्या निराशाजनक कामगिरीतून सावरत यावेळी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले.

संघाने ज्या 12 आयपीएल सत्रांत सहभाग नोंदवला त्यापैकी त्यांनी 11 वेळा प्लेऑफमध्ये धडक मारली; पण गेल्या तीन लढतींत चेन्नईला पराभूत व्हावे लागले. तर दिल्लीलादेखील गेला सामना गमवावा लागला. पहिला क्वॉलिफायर सामना जिंकून फायनलमध्ये कोण थेट धडक मारणार? याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.(delhi vs chennai)

चेन्नईने आतापर्यंत आठवेळा फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. ज्यामध्ये तीनवेळा त्यांनी जेतेपद मिळवले. चेन्नईचा संघ नेहमी अनुभवी खेळाडूंवर विश्वास ठेवतो आणि संघात फारसे बदलदेखील करत नाही.

धोनीने रवींद्र जडेजा, अंबाती रायुडू, सुरेश रैना, ड्वेन ब्रावो आणि फाफ डू प्लेसिससारख्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. यासोबत संघात जोश हेजलवूड आणि मोईन अली यासारखे खेळाडूदेखील आहेत. धोनीचा फॉर्म हा म्हणावा तसा चांगला नाही.

त्याने 14 सामन्यांत केवळ 96 धावाच केल्या आहेत; पण ऋतुराज गायकवाड (533 धावा) आणि डू प्लेसिस (546 धावा) यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. जडेजानेदेखील फलंदाजीत कमाल दाखवली आहे. शार्दुल ठाकूरने 14 सामन्यांत 18 विकेट घेत छाप पाडली. तर ड्वेन ब्रावोनेदेखील 12 विकेट घेऊन आपली उपयोगिता सिद्ध केली.

दिल्लीने लीगमध्ये 10 सामने जिंकले असले, तरीही त्यांच्या फलंदाजीत म्हणावा तसा आत्मविश्वास दिसला नाही. पृथ्वी शॉ (401 धावा) आणि शिखर धवन (544 धावा) यांनी काही चांगल्या खेळी केल्या; पण यूएईच्या सत्रात त्यांच्या फलंदाजांना चुणूक दाखवता आली नाही. मार्क्स स्टोईनिस जखमी झाल्याने संघाचे संतुलन बिघडले आहे.

शिमरोन हेटमायरने शेवटच्या षटकांत चांगली कामगिरी केली. दिल्लीची मजबूत बाजू गोलंदाजी राहिली आहे. आवेश खान (22 विकेट), अक्षर पटेल (15 विकेट), कगिसो रबाडा (13 विकेट) आणि एनरिक नॉर्जे (9 विकेट) यांनी गोलंदाजीत चमक दाखवली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT