Latest

WPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सने उडवला मुंबई इंडियन्सचा धुव्वा

Arun Patil

नवी मुंबई, वृत्तसंस्था : नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (WPL 2023) यांच्यात महिला प्रीमियर लीगचा 18 वा सामना झाला. या सामन्यात दिल्लीने मुंबईला 106 धावांत रोखले. या धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी दिल्लीने मुंबईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि या सामन्यात फक्त 9 षटकांत एकतर्फी विजय मिळवला. या जलद विजयामुळे गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या मुंबईला हुसकावून आता दिल्लीने कब्जा केला आहे.

शेफाली वर्माने सुरुवातीलाच स्फोटक फलंदाजी केली. शेफालीने 15 चेंडूंत 33 धावा कुटल्या. तर कर्णधार मेग लॅनिंग आणि एलिस केपसीनेही आक्रमक खेळी करत दिल्लीला विजयाच्या दिशेने नेले. मेगने 22 चेंडूंत 32 तर एलिसने 17 चेंडूंत 38 धावा कुटल्या. त्यामुळे दिल्लीने फक्त 9 षटकांत 110 धावांचे लक्ष्य गाठून मुंबई इंडियन्सचा पराभव केला.

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांवर दिल्लीने भेदक मारा केला. मारिझान कापने मुंबईच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना तंबूत पाठवले. मारिझान काप, शिखा पांडे आणि जेस जोनासने प्रत्येकी दोन विकेटस् घेतल्या. मुंबईने 20 षटकांत 8 बाद 109 धावाच केल्या. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी 110 धावांचे लक्ष्य मिळाले.

संक्षिप्त धावफलक (WPL 2023)
मुंबई इंडियन्स : 20 षटकांत 8 बाद 109 धावा. (पूजा वस्त्राकार 26, हरमनप्रीत कौर 23. मारिझाने काप 2/13.)
दिल्ली कॅपिटल्स : 9 षटकांत 1 बाद 110 धावा. (एलिसा केपसी नाबाद 38, शेफाली वर्मा 33, मेग लॅनिंग नाबाद 32.)

SCROLL FOR NEXT