पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्लीत चोरीची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चोरट्यांनी जंगपुरा येथील ज्वेलरी शोरूम फोडून हा गुन्हा केला. घराचे छत कापून चोरट्यांनी सुमारे 25 कोटी रुपयांचे दागिने लंपास केले आहेत, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
चोरट्यांनी दिल्लीतील जंगपुरा भागात असलेल्या शोरूमला लक्ष्य केले. चोरट्यांनी शोरूमची भिंत कापून प्रवेश केला. त्यांनी येथून सोने, हिरे आणि दागिने चोरून पळ काढला. सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
आम्ही रविवारी दुकान बंद केले. सोमवारी दुकानाला साप्ताहिक सुटी होती. मंगळवारी आम्ही दुकान उघडल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली, असे ज्वेलर्स दुकानाचे मालक संजीव जैन यांनी सांगितले. दुकान मंगळवारी सकाळी उघडले तेव्हा संपूर्ण दुकानात धूळ होती. स्ट्राँग रूमच्या भिंतीला छिद्र पडले होते. चोरट्यांनी सर्व दागिने लंपास केले आहेत. दुकानात सुमारे 20-25 कोटी रुपयांचे दागिने होते. सीसीटीव्हीचीही मोडतोड करण्यात आली आहे, असेही जैन यांनी 'एएनआय'शी बोलताना सांगितले.