Latest

Karnataka Election Result 2023: भाजपमधून बंडखोरी भोवली, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा पराभव

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपमधून बंडखोरी करत काँग्रेस गोटात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagadhish Shettar) यांना महागात पडले आहे. हुबळी धारवाड मध्य मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांचा पराभव झाला आहे. त्यांचा भाजपच्या महेश तेंगिनाकाई यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे.

शेट्टर (Jagadhish Shettar) कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. मात्र, तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना त्याच हुबळी धारवाड मतदारसंघातून उमेदवारी दिली. परंतु, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे लिंगायत समाजाचे मोठे नेते असलेले शेट्टर यांचा त्यांचेच शिष्य महेश तेंगिनाकाई यांनी पराभव केला. महेश तेंगिनाकाई हे निवडणूक प्रचारादरम्यान स्वत: शेट्टर यांचे शिष्य असल्याचे सांगत होते.

जगदीश शेट्टर हे कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे सहा वेळचे आमदार आहेत. भाजमधून बाहेर पडताच त्यांनी काँग्रेसचा हात धरला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपने शेट्टर यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेट्टर नाराज झाले होते. त्यामुळेच त्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

लिंगायत समाज हा कर्नाटकातील मोठा समाज आहे. ते (भाजप) बीएस येडियुरप्पा यांना त्यांचे नेते मानतात आणि जगदीश शेट्टर नेहमी दुसऱ्या स्थानी होते. भाजपने येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरून खाली आणून त्यांचा अनादर केला. म्हणूनच राजीनामा देताना ते रडले होते, असे सिद्धारामय्या यांनी म्हटले होते.

भाजपने पराभव स्वीकारला

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने पराभव स्वीकारला आहे. सीएम बसवराज बोम्मई यांनी निकालावर बोलताना म्हटले आहे की, मी जनादेशाचा आदर करतो. निकालाचा तपशीलवार अभ्यास करून कोठे कमी पडलो, याचे चिंतन करून पुन्हा लोकसभेत आम्ही चांगली कामगिरी करू.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT