उमरखेड; पुढारी वृत्तसेवा : नोंदी असतांनाही ७०-७५ वर्षात नेमलेल्या आयोग व समित्यांनी नोंदी नसल्याचे अहवाल दिले. ३५ लाख नोंदी सापडल्याने आता मराठा समाजाला कुणकुण लागली मराठा तो ओबीसी आरक्षणात आहे . त्यामुळे यावर्षी मराठा एकजूट झालेला आहे तेव्हा भुजबळांचे न ऐकता 24 डिसेंबर पर्यन्त मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
उमरखेड येथे आज (दि 7) सकल मराठा समाजाच्या वतीने स्थानिक गोपिकाबाई गावंडे मैदानात आयोजित विराट सभेत ते समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. जरांगे पाटील पुढे म्हणाले की, 17 दिवस अन्न पाण्या वाचून उपोषण केले . आरक्षण नाही शेती साथ देत नाही त्यामुळे मराठा युवक व्यसनाकडे वळले आहे .मराठा युवकांनी व्यसनापासून दुर राहावे असे आवाहन त्यांनी युवकांना केले . मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाज बांधवांच्या बळावर मी जिवाची बाजी लावत आहे . आरक्षण मिळविल्या शिवाय आता मागे हटू नका मराठ्यांच्या 35 लाख कुणबी नोंदी सापडल्या त्यामुळे आंदोलन यशस्वी झाले नोंदी नुसार प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली असून भुजबळांचे ऐकुन अन्याय केला तर तुम्हाला सुट्टी नाही .आता कोणत्याही परिस्थितीत आरक्षण सोडणार नाही असे ठणकावून सांगीतले . 24 डिसेंबर हा मराठ्यांच्या विजयाचा क्षण राहील अशी ग्वाही मनोज जरांगे पाटील यांनी दिली . यावेळी सकाळी 9 वाजता शहरातुन रॅली निघाली मनोज जरांगे यांच्यावर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली . त्यामुळे 10 वाजताच्या सभेला दुपारी 12:30 वाजता सुरुवात झाली . तत्पुर्वी शिवशाहीर गजानन जाधव यांनी पोवाडा गायन केले . हजारोंच्या संख्येने महिला पुरुष युवक , युवती विराट सभेत सहभागी झाले होते.
उमरखेड येथील विराट सभेला संबोधित करतांना भुजबळांवर निशाना साधतांना भुजबळ हे जातिय तेढ निर्माण करीत आहेत. कोणत्याही मंत्र्याने मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जातीवादी भाषा करणे योग्य नाही . 35 – 4o वर्षे ज्या पक्षांच्या जिवावर सत्ता भोगली त्या पक्षाची त्यांनी वाट लावली आहे . जेलच्या भाकरी खाल्लेला हा कलंकित माणुस मराठ्यांच्या लेकरांचा हक्क हिसकावतो आहे दंगली घडण्याची भाषा वापरतो . भुजबळांना मस्ती आहे आरक्षण मिळविल्यानंतर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू.