Latest

तरुणाईकडून जीवघेणी स्टंटबाजी; पवना बंधार्‍यावर फोटोसेशन

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हे पाहण्यासाठी नदीकाठी नागरिक गर्दी करत आहेत. त्यातच काही उत्साही आपल्या जिवाची पर्वा न करता नदीपात्रात उतरून स्टंटबाजी करताना दिसत आहेत. ही स्टंटबाजी जिवावर बेतू शकते, याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत आहे. रावेत-पुनावळे बंधार्‍याजवळ पवना नदी दुथडी भरून वाहत असताना एक तरुण बंधार्‍यावरून चालत जात होता. त्याचे मित्र त्याचा व्हिडिओ व फोटोशूट करत होते.

या तरुणाचे छायाचित्र दैनिक 'पुढारी'च्या छायाचित्रकाराने टिपले आहे. सध्या पावसामुळे शहरातील बंधार्‍याना पाणी आले आहे. हे पाणी पाहण्यासाठी आणि येथे फोटो, व्हिडीओ काढण्यासाठी तरुणाई जिवाची पर्वा न करता बंधार्‍यात उतरत आहेत. हल्ली सोशल मीडियावर असे स्टंटबाजी करतानाचे फोटो व्हायरल करण्याचे मोठे फॅड आले आहे. हे फॅड फक्त तरुणाईतच नाही, तर मध्यमवयीन व्यक्तींमध्येदेखील आहे. पण हे फोटो काढताना सुरक्षेचे तीनतेरा वाजतात आणि काही वेळेला जीवही गमवावा लागतो, याचे त्यांना काही देणे-घेणे नसते.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये एक महिला धबधब्याजवळ मोठ्या दगडावर बसून सेल्फी घेत आहे आणि मागून जोरात पाण्याचा लोंढा येत आहे. हे पाहून त्या महिलेच्या मुलांनी तिला बाहेर येण्यास विनंती केली तरी महिला सेल्फी काढण्यात गुंग होती. पाण्याच्या लोंढ्याबरोबर ती मुलांदेखत वाहून गेली. अशाप्रकारचे व्हिडीओ पाहून तरी नागरिकांनी सावध व्हावे, हा त्यामागचा हेतू असतो. मात्र, नागरिक यातून कोणताही बोध घेत नाहीत.

पावसाळ्यात ओढे, नद्या, धबधबे हे ओसंडून वाहत असतात. या मोसमात पाण्याला वेग असतो. यामध्ये पट्टीचे पोहणारेदेखील पाण्यात उतरण्याची हिंमत करत नाहीत. ओढे आणि धबधब्याचे पाणी उथळ असते. त्यामुळे नागरिकांना आपण बुडणार नाही असे वाटते. मात्र, उथळ पाण्याला वेग असल्याने व्यक्ती एका सेकंदात पाण्यात ओढला जातो. याचा अंदाज नागरिकांना येत नाही, त्यामुळे अपघात घडतात.

धोकादायक ठिकाणी आम्ही फलक लावले आहेत. मात्र, फलक काढून फेकून देणारे नागरिकदेखील आहेत. तसेच अशा ठिकाणी पहारा देण्यासाठी पुरेसे मुनष्यबळ नाही. नागरिकांनीच धोकादायक ठिकाणी न जाता प्रशासनाला सहकार्य करावे.

– ओमप्रकाश बहिवाल, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महापालिका.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT