Latest

David Warner 200 : डेव्हिड वॉर्नरला द्विशतकानंतर जल्लोष करणे पडले महागात! (Video)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : David Warner 200 : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने द. आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत नाबाद द्विशतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 200 धावा केल्यानंतर वॉर्नरने उडी मारून जल्लोष केला पण दुस-याच क्षणी त्याचा पाय ग्राउंडवर आदळला आणि त्याला दुखापत झाली. ज्यामुळे त्याला काही क्षणातच रिटायर्ड हर्ट होऊन मैदानातून बाहेर पडावे लागले. वॉर्नरने 254 चेंडूंचा सामना करत 16 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर कांगारू संघाने 3 गडी गमावून 386 धावा केल्या आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 197 धावांची भक्कम आघाडी घेतली.

सामन्याच्या पहिल्या दिवशी (सोमवारी) द. आफ्रिकेचा पहिला डावात 189 धावांत गुंडाळल्यानंतर कांगारूंनी उस्मान ख्वाजाची विकेट गमावून1 बाद 45 धावा केल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी (दि. 27) सामन्याच्या दुस-या दिवशी ऑस्ट्रेलियाने पुढे खेळण्यास सुरुवात करताच त्यांची 75 धावांवर दुसरी विकेट पडली. लबुशेन 35 चेंडूत 14 धावा करून धावबाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. दिवसाच्या सुरुवातीलाच यश मिळाल्याने द. आफ्रिका या सामन्यात कमबॅक करणार असे वाटत होते पण वॉर्नरने स्टीव्ह स्मिथच्या साथीने डावाची धुरा सांभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 239 धावांची भागीदारी रचली. यादरम्यान, वॉर्नरने आपल्या 100 व्या कसोटीत द्विशतक झळकावले. मात्र, दुखापतीमुळे त्याला रुटचा (218) शंभराव्या कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा विश्वविक्रम मोडता आला नाही.

स्मिथला शतकाची हुलकावणी….

स्मिथला कसोटीतील 30 वे शतक झळकावता आले नाही. तो 161 चेंडूत 85 धावा करून तंबूत परतला. एन्रिच नॉर्टजेने त्याला थ्युनिस डी ब्रुयनच्या हाती झेलबाद केले. स्मिथने या वर्षी नोव्हेंबरमध्ये शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर पर्थमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 200 धावा केल्या. मेलबर्नमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 386 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड नाबाद 48 आणि अॅलेक्स केरी नऊ धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 197 धावांनी पुढे आहे. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिच नोरखिया ​​आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

टीम इंडियासाठी निकाल महत्त्वाचा

सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 189 धावांवर गारद झाला होता. जर ऑस्ट्रेलियाने हा कसोटी सामना जिंकला तर भारताची आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यताही वाढेल. या पार्श्वभूमीवर या कसोटीचा निकालही भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

100 व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा जगातील दुसरा फलंदाज

100 व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा वॉर्नर हा जगातील दुसरा फलंदाज ठरला. त्याच्याआधी इंग्लंडच्या जो रूटने शंभराव्या कसोटीत शतकी खेळीचे द्विशतकामध्ये रूपांतर केले होते. रुटने 5 फेब्रुवारी 2021 रोजी भारताविरुद्ध चेन्नई कसोटीत 218 धावांची खेळी साकारली होती. (David Warner 200 he injured after celebration)

जवळपास तीन वर्षांनी शतक!

वॉर्नरने आपली 100 वी कसोटी संस्मरणीय बनवली. त्याने 27 डाव आणि 1089 दिवसांनी आपल्या शतकाची प्रतीक्षा संपुष्टात आणून 25 वे कसोटी शतक फटकावले. यावबरोबर 100 व्या कसोटीत शतक झळकावणारा तो जगातील 10 वा तर दुसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. यासह वॉर्नर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत विराट कोहली (72 शतके) नंतर दुसऱ्या क्रमांकावर पोचला. त्याच्या नावावर 45 शतकांची नोंद झाली असून त्याच्यानंतर जो रूट (44) तिस-या क्रमांक आहे. (David Warner 200 he injured after celebration)

100 व्या कसोटीत शतक झळकावणारा 10 वा फलंदाज

कॉलिन काउड्री (इंग्लंड) – 1968
जावेद मियाँदाद (पाकिस्तान) – 1989
गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज) – 1990
अॅलेक स्टुअर्ट (इंग्लंड) – 2000
इंझमाम-उल-हक (पाकिस्तान) – 2005
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – 2006
ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका) – 2012
हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) – 2017
जो रूट (इंग्लंड) – 2021
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – 2022

रिकी पाँटिंग हा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने आपल्या 100 व्या कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावली आहेत. तर पाहिल्या आणि 100 व्या कसोटीत शतक पूर्ण करणारा जावेद मियाँदाद हा एकमेव खेळाडू आहे.

वॉर्नरच्या 8000 धावा पूर्ण

मेलबर्न कसोटीत उतरण्यापूर्वी वॉर्नरला आठ हजारांचा आकडा गाठण्यासाठी 78 धावांची गरज होती. बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याने 8000 धावांचा टप्पा पूर्ण केला आणि आणखी एक मोठी उपलब्धी आपल्या नावावर नोंदवली. अशी कामगिरी करणारा वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा आठवा खेळाडू बनला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू रिकी पॉन्टिंग, अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, मायकेल क्लार्क, मार्क वॉ या दिग्गजांच्या क्लबमध्ये धडक मारली. (David Warner 200 he injured after celebration)

सचिनचा विक्रम धोक्यात

वॉर्नरने सलामीवीर म्हणून आपले 45 वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले असून त्याने सचिनची विक्रमाची बरोबरी साधली. सचिनने सलामीवीर म्हणून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक 45 शतके झळकावली आहेत. आता सचिनचा हा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. वॉर्नरने अजून एक शतक झळकवताच तो मास्टर ब्लास्टरला मागे टाकेल आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारा सलामीवीर बनेल.

सलामीवीर म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके

डेव्हिड वॉर्नर – 45
सचिन तेंडुलकर – 45
ख्रिस गेल – 42
सनथ जयसूर्या – 41
मॅथ्यू हेडन – 40

यापूर्वी 100 व्या वनडेतही वॉर्नरचे शतक…

वॉर्नरने यापूर्वी त्याच्या वन डे कारकिर्दीतील 100 व्या सामन्यात शतक ठोकले आहे. 2017 मध्ये, वॉर्नरने बंगळुरूमध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात शतकी खेळी साकारली होती. याचबरोबर तो 100 व्या कसोटी आणि 100 व्या वन डेत शतक झळकावणारा जगातील दुसरा फलंदाज बनला आहे. वॉर्नरपूर्वी विंडिजच्या गॉर्डन ग्रीनिजने असा पराक्रम केला आहे. ग्रीनिजने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 100 वा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला आणि शतक साजरे केले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT