यवत/नानगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पारगाव सा.मा. (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात सापडलेल्या दोन कुटुंबातील सात जणांचा थंड डोक्याने चुलत भावानेच खुन केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत पाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली असुन उर्वरित आरोपी लवकरच ताब्यात घेतले जातील, अशी माहिती पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी यवत पोलिस ठाणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अशोक कल्याण पवार (वय ३९) ,शाम कल्याण पवार (वय ३५), शंकर कल्याण पवार (वय ३७), प्रकाश कल्याण पवार (वय २४) आणि कांताबाई सर्जेराव जाधव (वय ४५, रा. ढवळेमळा निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहे. यामध्ये अनेक संशयित असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून हे सर्वच आरोपी नातेवाईक आहेत. या घटनेचा तपास सुरु असून ताब्यात घेतलेल्या संशयितांना बुधवारीच (दि. २५) न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी अशोक कल्याण पवार याचा मुलगा धनंजय याचा काही महिन्यापूर्वी वाघोली येथे अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला मृतक मोहन उत्तम पवार याचा मुलगा अनिल मोहन पवार हाच जबाबदार आहे, असा आरोपींना संशय होता आणि त्याचा मनात राग होता. त्याच कारणावरुन बदला घेण्यासाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.
पारगाव सा.मा. (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात दि. १८ जानेवारी ते २४ जानेवारीपर्यंत दोन कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. यामुळे दोन पुरुष, दोन महिला व तीन लहान मुलांचा समावेश होता.या प्रकरणामुळे परिसरात व राज्यभर खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही घटना हत्या की आणखी काही याची चर्चा सध्या सुरु होती. मात्र आता यावरील पडदा उघडला आहे.
ही घटना प्रथमदर्शनी कुटूंबाने जीवन संपवले असेल याची एकच चर्चा सुरु होती; मात्र या प्रकरणात नातेवाईकांनी घातपाताची शक्यता वर्तविली असल्याने या प्रकरणाला वेगवेगळे कंगोरे मिळत होते. मयत मोहन पवार यांना दोन मुले असून त्यापैकी एका मुलाने त्यांच्याच नात्यातील एका विवाहित मुलीला पळवून आणल्याने याच प्रकरणातून या दोन कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली की काय? अशी शंका उपस्थित होत होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात घडलेले हे वेगळेच प्रकरण पुढे आल्याने बदल्याच्या भावनेतून ही घटना घडली आहे. या खुनाच्या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे हे तपास करत आहेत.
ही घटना काळीज पिळवटून टाकणारी आहे. घरातील नातेवाईकांनी मागील घटनेचा कसूर काढला; मात्र या घटनेत या निष्पाप बालकांचा काय गुन्हा होता की त्यांच्यावर ही वेळ यावी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.