Latest

कोल्हापूर, सांगलीत आलेल्या महापुराला कर्नाटकातील धरणे, बंधारे, पूल कारणीभूत!

Arun Patil

कोल्हापूर, सुनील कदम : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील महापुराला कर्नाटकातील अलमट्टीसह अन्य काही धरणे, बंधारे आणि पूल कारणीभूत ठरत असावेत, असा प्राथमिक निष्कर्ष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी विभागाने काढला आहे. याप्रकरणी सविस्तर अभ्यास करून अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी या अभ्यास गटाला आणखी बर्‍याच तांत्रिक माहितीची आवश्यकता आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलसंपदा विभागांकडून ही माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याचा सविस्तर तांत्रिक अभ्यास करूनच याबाबतचा अंतिम अहवाल शासनाला सादर केला जाईल.

2019 सालच्या महापुरानंतर या महापुराची कारणे व उपाययोजना सुचविण्यासाठी तत्कालीन राज्य शासनाने जलसंपदा विभागाचे माजी सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची एक समिती नेमली होती. या समितीने 27 मे 2020 रोजी आपला अहवाल शासनाला सादर केला होता. या समितीने महापूर रोखण्यासाठी शासनाला 18 प्रकारच्या शिफारशी केल्या होत्या. मात्र, महापुराला जबाबदार असलेल्या अलमट्टी धरणालाच या समितीने क्लीन चिट देऊन महापुराला अलमट्टी धरणाचे बॅकवॉटर कारणीभूत नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे या समितीच्या  निष्कर्षांवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली होती. त्यामुळे शेवटी नंदकुमार वडनेरे यांनी याबाबतीत आणखी अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे मान्य केले होते.

त्यानुसार महापुराच्या कारणांचा सखोल तांत्रिक अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 19 एप्रिल 2022 रोजी उत्तराखंड येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी, रूरकी या संस्थेला कळविले होते. त्यानुसार या संस्थेने डॉ. ए. के. लोहानी, डॉ. आर. व्ही. काळे आणि अभियंता जे. के. पात्रा यांचा एक अभ्यास गट महाराष्ट्रात पाठविला होता. या अभ्यास गटातील सदस्यांनी 1 जून ते 5 जून 2023 दरम्यान सांगलीपासून अलमट्टीपर्यंतच्या कृष्णा नदीपात्राची पाहणी केली. तसेच 2005 आणि 2019 साली आलेल्या महापुरांच्या कालावधीतील सर्व ती तांत्रिक माहिती मिळविली. या कालावधीतील पाऊस, धरणांमधील पाणीसाठा, विसर्ग, महापुराची पातळी, याबाबतची माहितीही या अभ्यास गटाने विचारात घेतली.

या तांत्रिक माहितीच्या आधारे या समितीने काही प्राथमिक निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार कर्नाटक हद्दीत सध्या बांधण्यात येत असलेला जुगूळ-खिद्रापूर पूल महापुराने बाधित होण्याचे संकेत दिले आहेत. चंदूर-टाकळी पुलाबाबतही या अभ्यास गटाने अशीच साशंकता व्यक्त केली आहे. कर्नाटकात सध्या बांधकामाधीन असलेला कल्लोळी बंधारा आणि पुलामुळे कृष्णा नदीच्या मुख्य प्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता दर्शविली आहे.

2019 सालातील महापुरावेळी कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद होते. याचा कोल्हापुरातील महापुरावर परिणाम झाल्याची बाबही या अभ्यास गटाने अधोरेखित केलेली आहे. चिक्कपडसलगी येथील पूल आणि बंधारा अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडत असल्याची बाबही अभ्यास गटाने निदर्शनास आणून दिली आहे. गलगली इथला बंधारा अनियमित किंवा अशास्त्रीय पद्धतीने बांधण्यात आल्याची बाबही या अभ्यास गटाने राज्य शासनाला दाखवून दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने या अभ्यास गटाला आवश्यक असलेली तांत्रिक माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र, महापूर आणि अलमट्टी यांचा परस्पर अभ्यास करण्यासाठी अजूनही बर्‍याच तांत्रिक बाबींची माहिती आणि अभ्यास आवश्यक असल्याचे या अभ्यास गटाचे मत आहे. कर्नाटककडूनही या अभ्यास गटाला अजून आवश्यक त्या प्रमाणात माहिती मिळालेली नाही. ही सर्व माहिती मिळाल्यानंतरच या अभ्यास गटाचा अंतिम अहवाल तयार होणार आहे. मात्र, अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यातच या अभ्यास गटाने महापूर आणि अलमट्टी यांच्या परस्परसंबंधांकडे अंगुलीनिर्देश केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

SCROLL FOR NEXT