Latest

डी. एड., बी.एड.च्या उमेदवारांचे भवितव्य धोक्यात

अमृता चौगुले

गणेश खळदकर

पुणे : गुजरात राज्यात एमबीए, एमसीए, फार्मसीच्या उमेदवारांना प्राथमिक शिक्षक होण्याची संधी देण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षक पात्रतेत बदल करण्यात आला आहे. तसाच बदल महाराष्ट्रात झाल्यास शिक्षक होण्यासाठीची स्पर्धा तीव्र होणार असून पारंपरिक पदवी घेऊन डी. एड., बी.एड. केलेल्या उमेदवारांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गुजरात राज्यसरकारने केलेल्या बदलांनुसार प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तंत्रशिक्षण आणि व्यवस्थापन विषयात पदवी घेतलेल्या उमेदवारांना प्राथमिक शिक्षक म्हणून सामावून घेण्यात येणार आहे. यामध्ये बी.ई. आणि बी.टेक. पदवी घेतलेले उमेदवार सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवतील. तर बीबीए, बीसीए तसेच बीए समाजशास्त्र पदवी घेतलेले उमेदवार समाजशास्त्र विषय शिकवण्यास पात्र असतील असा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात बारावीनंतर डी.एड. आणि पारंपरिक कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे पदवी शिक्षण घेऊन त्यानंतर बी.एड. झालेले उमेदवार शिक्षक होण्यास पात्र होतात. परंतु शिक्षक म्हणून कामाला लागण्यासाठी त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी आणि अभियोग्यता व बुध्दिमापन चाचणी उत्तीर्ण व्हावे लागते. सध्या राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जवळपास 6 लाखांच्या आसपास उमेदवार शिक्षक भरतीसाठी इच्छुक आहेत. परंतु शिक्षक होण्यासाठीची पात्रता बदलण्यात आली तर मात्र संबंधित उमेदवारांना अन्य उमेदवारांबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे. त्यातून शिक्षक होण्यासाठी जीवघेणी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.

गुजरात राज्यात 17 मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये बदल करण्यात आला आहे. तसा बदल आपल्या राज्यातही झाल्यास अशी शैक्षणिक पात्रता ज्या नोकरी अथवा व्यवसायासाठी घेतली त्याऐवजी शिक्षक म्हणून किती जण तयार होतील हा प्रश्न आहे . शिवाय महाराष्ट्रात अनेक वर्षे भरती प्रक्रिया नाही. त्यामुळे अगोदरच आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि टीईटी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेक जण भरती प्रक्रियेची वाट पाहात आहेत. त्यात स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे शालेय शिक्षणामध्ये जे नियमित विषय शिकवले जातात, त्यामध्ये या अन्य उच्च शैक्षणिक पात्रतेचा कितपत वापर होईल हा मूळ प्रश्न आहे.

                – महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ.

SCROLL FOR NEXT