Latest

गोव्यात सिलिंडर स्फोट, 70 वर झोपड्या खाक

दिनेश चोरगे

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा :  आगरवाडा, कळंगुट येथे रविवारी दुपारच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत येथील सुमारे 70 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत 10 ते 12 गॅस सिलिंडर्सचा स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने 24 हून जास्त घरगुती गॅस सिलिंडर झोपडीच्या बाहेर काढले. आगीत जीवितहानी झाली नसली, तरी एक जण आगीच्या ज्वाळांत जखमी झाला. त्याला कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

आग एवढी भीषण होती की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिळर्ण, म्हापसा, पर्वरी आणि पणजी येथील अग्निशमन दलाचे बंब बोलावण्यात आले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. सुमारे 45 हून अधिक जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धैर्याने काम करत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून, सुमारे दीड तासाच्या मेहनतीनंतर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

अग्निशमन दलाचे अधिकारी बास्को फेर्राव, श्रीकृष्ण पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आगरवाडा येथे एकमेकांना लागून असलेल्या या झोपडपट्टीतील एका झोपडीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, त्या भडक्याने शेजारील इतर झोपड्यांना आगीची झळ बसली. वार्‍याच्या झोतामुळे लागून असलेल्या झोपड्या पेडल्या. त्या झोपड्यांमधील सिलिंडर्सनीही पेट घेतला. त्यामुळे मोठे स्फोट झाले. काही क्षणात आगिने रौद्ररूप धारण केले. आगरवाडा, कळंगुट येथील मथयास यांच्या मालकीच्या जागेतील या झोपड्या जळून खाक झाल्यामुळे या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एका झोपडीत तीनहून अधिक सिलिंडर

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, येथील प्रत्येक झोपडीत अग्निशामक दलाच्या जवानांना तीन किंवा त्याहून
अधिक सिलिंडर आढळलेे. या झोपड्यांमध्ये एकापेक्षा अधिक सिलिंडर कसे? याचा तपास अग्निशामक दल व पोलिस करणार असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांनी दिली.

SCROLL FOR NEXT