आशिष देशमुख
पुणे : यंदा केरळमध्ये मान्सून वेळेवरच येईल. मात्र, त्याची पुढची दिशा अन् गती हे चक्रीवादळ ठरविणार आहे. हा अंदाज येण्यास हवामान विभागाला आणखी चार दिवस लागणार आहेत. मात्र, अल निनोचा प्रभाव ऑगस्टनंतर होणार असल्याने घाबरण्याचे कारण नाही, असा दावा पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपि यांनी 'पुढारी'शी बोलताना केला आहे.
यंदा अल् निनो सकारात्मक राहणार असल्याने व अवकाळी पाऊस सतत सुरू असल्याने शेतकर्यांसह सामान्य नागरिकांना जूनमध्ये पाऊस वेळेवर येणार की नाही, याचीच चिंता वाटत आहे. दरम्यान, बुधवारपासून बंगालच्या उपसागरात मोचा हे चक्रीवादळ सक्रिय झाल्याने त्याचा परिणाम अवकाळी पावसासह मान्सूनवर काय होईल, याची देखील उत्सुकता आहे. या सर्व बाबी दै. 'पुढारी'ने हवामानशास्त्रज्ञांकडून जाणून घेतल्या तेव्हा यंदा मान्सून वेळेवरच येणार आहे. लोकांनी घाबरू नये, असा दिलासा पुणे वेधाशाळेतील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपि यांनी दिला आहे.
मोचा चक्रीवादळ बुधवारपासून सक्रिय झाले. त्याचा वेग गुरुवारपासून वाढणार असून, हे वादळ आगामी मान्सूनची दिशा व गती ठरविणार आहे. केरळमध्ये मान्सून वेळेवरच येईल. फक्त या वादळामुळे त्याचा पुढचा प्रवास लांबणार की जवळ येणार, हे कळण्यास अजून चार ते पाच दिवस लागणार आहेत.
कश्यपि यांनी सांंगितले की, चक्रीवादळ हे हवेतील बाष्प पळवून नेते. त्यामुळे हे चक्रीवादळ सक्रिय होताच राज्यातील बाष्प कमी होऊ लागले असून, कमाल तापमान वाढत आहे. काल जळगावचे तापमान 42 अंशांवर होते, तर बहुतांश शहरांचे तापमान 40 अंशांवर गेले. बुधवारचे पुणे शहराचे तापमान 39 अंशांवर गेले. त्यामुळे आता पारा 4 ते 5 अंशांनी वाढून राज्यात उष्णतेची लाट सक्रिय होईल.
या अवकाळी पाऊस अन् अल निनोचा काही संबंध नाही तसेच अल निनो व मान्सूनचे गुणोत्तर 1ः1 असेही नाही. बहुतांश वेळा अल् निनो सक्रिय असताना मान्सून चांगला बरसलेला आहे. अल् निनो स्ध्या अतिशय संथ आहे. तो ऑगस्टमध्ये सक्रिय होत असल्याने जून-जुलैमध्ये पाऊस पडणार नाही, असा अंदाज बांधणे चुकीचे आहे, असा दावा कश्यपि यांनी 'पुढारी'शी बोलताना केला.
बुुधवारी सकाळी 11.30 वाजता बंगालच्या मध्य-पूर्व उपसागरात कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन रात्री चक्रीवादळात रूपांतर झाले. उद्या 11 रोजी त्याची गती ताशी 55 किमीवरून 90 ते 110 किमी इतका होणार आहे. 12 रोजी त्याचे तीव्र, तर 13 व 14 रोजी अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. 14 रोजी रात्री त्याची गती कमी होऊन ते बांगलादेश व म्यानमारच्या दिशेने जाणार आहे. बुधवारी सकाळी बंगालच्या उपसागरात तयार झालेला हा कमी दाबाचा पट्टा. बुधवारी रात्री त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले.