Latest

Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार झाले मिचाँग चक्रीवादळ

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळ रविवारी तयार झाले. आता त्याचा प्रवास चेन्नईच्या दिशेने सुरू झाला असून, सोमवारी ते तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात सध्या विदर्भात पावसाचा जोर राहील, तर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात 6 ते 9 डिसेंबर या कालावधीत पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ मिचाँग चक्रीवादळ रविवारी सकाळी 11.30 च्या सुमारास तयार झाले. सुरुवातीला त्याचा वेग 11 किलोमीटर असून, ते सध्या चेन्नईपासून 230, पुद्दुचेरीपासून 250, नेल्लोरपासून 350 किलोमीटरवर आहे. उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर 4 डिसेंबरच्या दुपारपर्यंत ते पोहोचणार आहे. त्यानंतर राज्यातील पाऊस वाढू शकेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण किनारपट्टीवर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात फक्त विदर्भात दोन दिवस पाऊस आहे. तर उर्वरित राज्यात 6 ते 9 या कालावधीत पावसाचा अंदाज दिला आहे.

कश्मीरमध्ये हिमवर्षाव…
जम्मू- काश्मीरमध्ये पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला असून, हलक्या पावसासह हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस नाही
राज्यात सध्या फक्त विदर्भात पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 4 ते 6 डिसेंबर दरम्यान पूर्व मध्य प्रदेशासह आणि विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे. तर मराठवाड्याच्या तुरळक भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. मात्र कोकण, मध्य महाराष्ट्रात सध्या पाऊस नाही; मात्र 4 डिसेंबरनंतर चक्रीवादळाचा वेग वाढल्यावर कोकण, मध्य महाराष्ट्रात 6 ते 9 डिसेंबरपर्यंत पाऊस राहील, असा अंदाज आहे.

SCROLL FOR NEXT