Latest

Cyclone Biparjoy | बिपरजॉय धडकण्यापूर्वीच जोरदार वाऱ्याचा तडाखा, ३ ठार, ६७ रेल्वे गाड्या रद्द

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय गुजरातच्या जखाऊ मासेमारी बंदराजवळ धडकण्यापूर्वीच जोरदार वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सौराष्ट्रमध्ये (Saurashtra) जोरदार पाऊस पडत आहे. तसेच जोरदार वाऱ्यामुळे पडझड होऊन दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. भूज शहरात भिंत कोसळून एक चार वर्षांचा मुलगा आणि एक सहा वर्षांची मुलगी यांचा मृत्यू झाला. गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील जसदन तालुक्यात जोरदार वाऱ्यामुळे राज्य महामार्गावर मोटरसायकलवर झाड पडल्याने एक महिला ठार झाली, तर तिचा पती जखमी झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. गुजरातच्या अनेक भागांमध्ये 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहत आहेत. दरम्यान, बिपरजॉयमुळे पश्चिम रेल्वेने गुजरातच्या किनारी भागात जाणाऱ्या ६७ गाड्या रद्द केल्या आहेत. (Cyclone Biparjoy)

काही गाड्या एक किंवा अधिक दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. यात दिल्ली सराय रोहिल्ला-ओखा स्पेशल, ओखा राजकोट (आरक्षित नसलेली), अहमदाबाद-वरावल एक्स्प्रेस, इंदूर-वरावल महामना एक्स्प्रेसचा समावेश आहे.

कच्छ आणि द्वारका येथील १२ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे. या दोन जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत लोकांना स्थलांतरित केले जाण्याची शक्यता आहे.

कच्छ (Kutch) आणि देवभूमी द्वारका (Devbhumi Dwarka) जिल्ह्यांत आणि गुजरातच्या किनार्‍यावर पडझडीच्या घटना घडल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ धडकण्याच्या एक दिवस आधीच या भागात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

मुसळधार पाऊस

अमरेली, देवभूमी द्वारका, जामनगर, कच्छ, पोरबंदर, गीर-सोमनाथ आणि जामनगर जिल्ह्यांमधील किनाऱ्यावर महाकाय लाटा आदळत असून अरबी समुद्र अत्यंत खवळला आहे. समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने पोरबंदरमधील इंदुरेश्वर महादेव मंदिराची भिंत कोसळली, तर वेरावळ शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Cyclone Biparjoy)

गुजरातला ऑरेंज अलर्ट

बिपरजॉय चक्रीवादळ बुधवारी गुजरात व पाकिस्तानच्या सीमेवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. किमान १६० किमी वेगाने हे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने गुजरातला ऑरेंज अलर्ट दिला आहे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळाबाबत माहिती घेतली आणि प्रशासनाला सूचना केल्या.

मुंबईतील अरबी समुद्रात भरतीला उधाण

दरम्यान, या चक्रीवादळामुळे मुंबईत समुद्र खवळला असून, खराब हवामानामुळे विमानसेवा ठप्प झाली आहे. भारतीय तटरक्षक दलाची जहाजे गुजरातच्या किनारपट्टीवर गस्त घालत आहेत. तसेच मुंबईच्या वरळी सी फेसवरील अरबी समुद्रात भरतीला उधाण आले आहे. समुद्राला भरती आल्याने मुंबईतील मरीन ड्राईव्हवर समुद्राच्या लाटा उसळत आहेत.

किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश

अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय चक्रीवादळ आता वेगाने किनारपट्टीकडे सरकत आहे. गुजरात आणि पाकिस्तानच्या सीमेवर बुधवारी हे चक्रीवादळ धडकेल, असा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. हवामान खात्याने गुजरातेत ऑरेंज अलर्ट दिला आहे. सौराष्ट्र, कच्छ भागात या चक्रीवादळाची तीव्रता अधिक राहाणार आहे. गुजरातचे सर्व समुद्रकिनारे बंद करण्यात आले आहेत. ज्या भागात वादळ धडकण्याची शक्यता आहे, त्या भागातील लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. एनडीआरएफची पथके व स्थानिक प्रशासनाची मदत व बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

१३०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

बुधवारी रात्री अथवा गुरुवारी सकाळी चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ भागात धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातच्या किनार्‍यावर मासेमारीला तसेच किनार्‍यावर फिरण्यास बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सध्या १३०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागड आणि मोरवी येथे १५ जून रोजी १२५ ते १३५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, वार्‍याचा
वेग १५० किमीपर्यंत पोहोचू शकतो, असा अधिकार्‍यांचा अंदाज आहे.

मुंबईत वारे आणि पाऊस

बिपरजॉय चक्रीवादळ महाराष्ट्राजवळून पुढे सरकताना किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असून समुद्र खवळला आहे. मुंबईतही समुद्राच्या जोरदार लाटा धडकत असून सोसाट्याचे वारे वाहत आहे. या खराब वातावरणाचा फटका विमानसेवेला बसला असून अनेक विमानांना विलंब होत आहे. आणखी ३६ तास अशीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे.

बिपरजॉय नेमके कुठे पोहोचले?

ईशान्य आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ "बिपरजॉय" गेल्या ६ तासांत १० किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेला सरकले आहे आणि आज १३ तारखेला ते भारतीय वेळेनुसार ५.३० वाजता ईशान्य आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावर पोरबंदरपासून सुमारे ३०० किमी पश्चिम-नैऋत्येस, देवभूमी द्वारकाच्या २९० किमी नैऋत्येस, जखाऊ बंदराच्या ३४० किमी दक्षिण-नैऋत्येस, नलियाच्या नैऋत्येस ३५० किमी आणि कराची (पाकिस्तान) येथून ४८० किमी अंतरावर घोंघावत होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT