Latest

हेअरकट : केस कापताय?, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

स्वालिया न. शिकलगार

चांगला हेअरकट आपल्या चेहर्‍याला चांगला लूक देतो. या उलट खराब हेअर कट असेल तर आपला लूकही बिघडतो, शिवाय आत्मविश्वासही कमी होतो. म्हणूनच केस कापायला जाताना काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात.

चेहर्‍याचा आकार ः आपल्या चेहर्‍याचा आकार एकदा चांगल्या प्रकारे ओळखला म्हणजे कोणता हेअरकट त्यावर अधिक चांगला दिसेल हे समजणे सोपे होते. चेहर्‍याचा आकार समजून घेण्यासाठी आपल्या जबड्याची रेषा अर्थात जॉ लाईन बघावी. जर ही रेषा हनुवटीपासून कानापर्यंत गोलाकार असेल तर चेहरा गोल आहे, असे मानले जाते. हनुवटी टोकदार असेल तर आणि जबड्याचा हलका कोन असेल तर चेहरा अंडाकार मानला जातो. हनुवटी अधिक टोकदार असेल आणि जबड्याची रेषा वक्राकार असेल तर चेहरा हार्टच्या आकाराचा आहे, असे समजावे. जबड्याच्या रेषा किनार्‍याकडून बाहेरच्या बाजूला गेल्या असतील तर चेहरा चौकोनी असतो. आपण आपला चेहरा कागदावर रेखाटावा. चेहरा कसाही असला तरी हेअरस्टाईल अशी असावी जी आपल्या चेहर्‍याला अंडाकार भासवेल, कारण चेहर्‍याचा हाच आकार सर्वांत चांगला दिसतो; पण चेहरा आधीपासूनच अंडाकार असेल तर कोणतीही हेअरस्टाईल चांगली दिसते.

केसांचा प्रकार ः केसांचा पोत कसा आहे, हे समजून घ्यावे. केस राठ आणि कुरळे वा पातळ कोणत्या प्रकारातील आहेत हे पाहावे. त्यानुसार हेअरस्टाईलची निवड करावी; कारण स्टाईल कितीही आकर्षक असली तरी ती केसांच्या प्रकारानुसार करणे आवश्यक असते. हेअर कट करताना एखाद्या सेलिब्रेटीचे अनुकरण करणे वा फॅशन डोळ्यांसमोर ठेवून तसा हेअरकट करणे टाळावे; कारण सेलिब्रेटींकडे खासगी हेअर स्टाईलिस्ट असतात. ते तासन् तास त्यांच्या केसांवर काम करतात. त्यामुळे आपल्या जवळच्या हेअर स्टाईलिस्टशी बोलून कुठला हेअरकट आपल्याला चांगला दिसेल आणि तो सहजपणे मेंटेन ठेवता येेईल, हे समजून घ्यावे.

आपण केसांसाठी जास्त वेळ देऊ शकणार नाही, हे माहीत असेल तर मेंटेन करायला कमी वेळ लागेल अशी हेअर स्टाईल निवडावी. म्हणजे केस धुतले तर चटकन तयार होता आले पाहिजे, अशी स्टाईल निवडा; मात्र वेळ भरपूर असल्यास मेंटेन करण्यास अवघड आणि वेळखाऊ असणारी हेअर स्टाईल निवडायला हरकत नाही. केसांचे ट्रिमिंग करायचे असेल तर ते केव्हाही करता येईल; पण दहा-बारा इंच केस कापायचे असतील तर त्यावर किमान महिनाभर विचार करावा. म्हणजे नंतर पश्चात्ताप होणार नाही, कारण मोठ्या केसांचा एकदम छोटा कट किंवा पिक्सी कट करण्याचा विचार असेल तर पूर्ण विचार करणे योग्य ठरते; परंतु थोडेच केस कापायचे असल्यास त्याची फारशी गरज नसते. शेवटी केस कापणे किंवा न कापणे हे पूर्णपणे आपल्या निर्णयावर अवलंबून असते, कारण स्वतःलाच त्याची काळजी घ्यायची असते; पण केस कसे कापायचे, कापायचे की नाही, यामुळे चेहर्‍याला मात्र फरक पडत असतो हे मात्र लक्षात घ्यायला हवे.
– कीर्ती कदम

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT