Latest

CSK IPL 2024 : सीएसकेला झटका! आयपीएलच्या सलामी सामन्यातून ‘मॅच विनर’ गोलंदाज बाहेर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : CSK IPL 2024 : चेन्नईचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. 21 वर्षांचा श्रीलंकन गोलंदाज पथिराना या महिन्यांच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीतून तो अद्याप सावरु शकलेला नाही. दुखापतीमुळे पथिराना बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातही खेळू शकला नव्हता. पथिरानावर सध्या श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या फिजिओकडून उपचार सुरू आहेत.

आयपीएलचा सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघांदरम्यान (RCB) रंगणार आहे. पण त्याआधीच चेन्नई सुपर किंग्जला वेगवान गोलंदाज पाथिरानाच्या रुपात धक्का बसला आहे. पाथिराना स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडल्याने सीएसकेची गोलंदाजी कमकुवत होण्याचा धोका वाढला आहे.

पाथीरानाने गेल्या मोसमात घेतल्या 19 विकेट

आयपीएल 2022 मध्ये पाथीरानाने सीएसकेकडून पदार्पण केले होते. त्या हंगामात या श्रीलंकेच्या खेळाडूला 2 सामने खेळण्याची संधी मिळाली होती. ज्यात त्याने 26.00 च्या सरासरीने फक्त 2 विकेट घेतल्या. त्यानंतर आयपीएल 2023 मध्ये तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि स्पर्धेतील 12 सामन्यांमध्ये पाथिरानाला मुख्य गोलंदाज म्हणून मैदानात उतरवले. यादरम्यान त्याने 19.53 च्या सरासरीने 19 विकेट घेतल्या. यातील 18 बळी तर त्याने डेथ ओव्हर्समध्ये घेतल्या. अशाप्रकारे तो गेल्या मोसमात सीएसकेकडून सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला होता.

कॉनवेही दुखापतीमुळे बाहेर

यापूर्वी, न्यूझीलंडचा डेव्हन कॉनवे दुखापतीमुळे आयपीएल 2024 च्या पहिल्या टप्प्यातून बाहेर पडला आहे. कॉनवेच्या अनुपस्थितीत सीएसकेच्या सलामीच्या जोडीत बदल होणार आहे.

मुस्तफिजुर रहमानला संधी मिळणार?

पाथीरानाच्या जागी बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला पहिल्या काही सामन्यांसाठी संधी मिळू शकते. तो दीपक चहर आणि शार्दुल ठाकूरसह तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून विरोधी संघाला आव्हान देईल. रहमानने गेल्या मोसमात फक्त 2 सामने खेळले, ज्यात त्याने 1 बळी घेतला. त्याने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 48 सामन्यांत 7.93 च्या इकॉनॉमी रेटने 47 विकेट घेतल्या आहेत.

SCROLL FOR NEXT