Latest

धोनीचं टेन्शन वाढलं! वर्ल्डकपनंतर ‘या’ खेळाडूच्या गुडघ्यावर होणार शस्त्रक्रिया

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धा सध्या सुरू आहे. सर्व संघ एकमेकांशी भिडत आहेत, पण त्याच दरम्यान संघातील खेळाडूंना दुखापत होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याचा संघांवर विपरीत परिणाम होत आहे. काही खेळाडूंना अजिबात खेळताही येत नाहीय. यात इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सचा समावेश आहे. तो यंदाच्या विश्वचषकात आपल्या संघासाठी फारसे सामने खेळू शकलेला नाही. संधी मिळूनही तो आश्वासक कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. विश्वचषक संपल्यानंतर स्टोक्सच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आयपीएलमधील धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जला मोठा फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरल खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, आयपीएल 2024 ची तयारीही सुरू आहे. डिसेंबरमध्ये आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव होऊ शकतो, असे मानले जात आहे.

स्टोक्सच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार

स्टोक्स गेल्या 18 महिन्यांपासून गुडघ्याच्या समस्येशी झुंजत आहे. तो विश्वचषकात फलंदाज म्हणून खेळत आहे. 1 जुलैपासून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदाही गोलंदाजी केलेली नाही. अशातच तो वनडे निवृत्ती मागे घेऊन भारतात विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी आला. या स्पर्धेत तो फक्त फलंदाजी करेल गोलंदाजी करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. असे असूनही इंग्लंडच्या मोजक्याच सामन्यांमध्ये स्टोक्सला संधी मिळाली. ज्यात तो चमक दाखवू शकला नाही. दरम्यान, वर्ल्ड कपनंतर स्टोक्सच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे समजते आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. त्या मालिकेसाठी उपलब्ध असावे अशी स्टोक्सची इच्छा आहे. इंग्लंडचा संघ जानेवारीत भारत दौ-यावर येणार आहे. उभय देशांमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये सुरुवात होत आहे. ही मालिका महत्त्वाची असेल कारण ती जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाणार आहे.

स्टोक्स आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळतो

दरम्यान, स्टोक्स आयपीएलमध्ये एमएस धोनीचा संघ सीएसकेकडून खेळतो. गेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने त्याला आपल्या संघात घेण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली होती. CSK संघ चॅम्पियन झाला असला तरी त्यात बेन स्टोक्सचे फारसे योगदान राहिले नाही. असे मानले जाते की लवकरच सर्व दहा आयपीएल संघ आपापल्या किरकोळ आणि रिलीझ खेळाडूंची यादी जाहीर करतील. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा लिलाव होणार आहे. अशा परिस्थितीत CSK संघ बेन स्टोक्सला सोडतो की त्याला सोबत ठेवण्याचा निर्णय घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT