Latest

पती क्रूर वागला म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ३९ वर्षीय आरोपी पतीला सत्र न्यायालयाने मोठा दिलासा देत निर्दोष मुक्तता केली. न्यायाधीश एन. पी. मेहता यांनी केवळ पती पत्नीसोबत क्रूरपणे वागला म्हणून त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही. हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कृतींचे ठोस पुरावे असणे आवश्यकच आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा देत आरोपीची सात वर्षानंतर निर्दोष सुटका केली.

मुलुंड येथे रहाणारा आरोपी नरेश चावडा याला पत्नीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जून २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. आरोपीला दारूचे व्यसन होते. त्याने दारूच्या नशेत पत्नीचा छळ केला. त्याच्या याच त्रासाला कंटाळून पत्नी ममता हिने आत्महत्या केली, असा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश एन. पी. मेहतांसमोर झाली. यावेळी न्यायालयाने सरकारी पक्षाच्या पुराव्यांवरच बोट ठेवले. आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी केवळ त्याचे पत्नीशी क्रूरपणे वागणे पुरेसे नाही. त्याने पत्नीला स्वतःचा जीव संपवण्याचा टोकाचा निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त केल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे आरोपीला दोषी ठरवता येणार नाही, असे मत नोंदवत आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

SCROLL FOR NEXT