Latest

WB Panchayat Election : प. बंगालमध्‍ये मतमोजणीवेळीही हिंसाचाराचे सत्र सुरुच

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मतदानादिवशी काही जिल्‍ह्यांमध्‍ये हिंसाचाराचे गालबोट लागलेल्‍या पश्‍चिम बंगाल पंचायत निवडणुकीत आज मतमोजणीवेळीही हिंसाचाराचे सत्र सुरुच राहिले आहे. डायमंड हार्बरमधील मतमोजणी केंद्राबाहेर क्रूड बॉम्बस्फोट झाल्‍याने एकच खळबळ उडाली. दरम्‍यान, हावडा येथील मतदान केंद्राबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांना पांगवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला. यावेळी जमावाने मतमोजणी केंद्रात घुसण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याने प्रचंड तणाव निर्माण झाला. ( WB Panchayat Election)

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्‍या मतमोजणीला आज सकाळी प्रारंभ झाला. तसेच मतमोजणीदरम्यान अनेक भागातून हिंसाचाराची माहिती समोर येत आहे. दरम्‍यान मतमोजणीच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस 3317 जागांपैकी 267 जागांवर आघाडीवर आहे. राज्यातील उत्तर 24 परगणामधील 19 पंचायत जागांवर टीएमसी आघाडीवर आहे.

WB Panchayat Election : हिंसाचाराविरोधात लढा सुरूच राहील : राज्यपाल

पश्‍चिम बंगालमध्‍ये निवडणूक काळात झालेल्‍या हिंसाचाराबाबत बोलताना राज्यपाल सीव्ही आनंद बोस म्हणाले की, हिंसाचारावर आम्ही नक्कीच कडक कारवाई करू. हिंसाचारामुळे नव्या पिढीच्या भवितव्यावर परिणाम होत आहे. सर्व अधिकारी गुंड आणि कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करतील. नवीन पिढीसाठी आम्ही बंगालला सुरक्षित ठिकाण बनवू. बंगालमधील वाढत्या हिंसाचाराविरोधात सातत्याने लढा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले आहे की, सोमवारी पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीतील हिंसाचारामुळे आपल्या जीवाच्या भीतीने १३३ लोकांनी आसामच्या धुबरी जिल्ह्यात आश्रय घेतला आहे. आम्ही त्यांना मदत शिबिरात आश्रय दिला आहे. तसेच त्‍यांना अन्न आणि वैद्यकीय मदत दिली आहे.

SCROLL FOR NEXT