कोल्हापूर, आशिष शिंदे : हवामान बदलाचे रौद्र संकट आता पश्चिम महाराष्ट्रावरही घोंगावत आहे. परिणामी उष्णता, थंडीच्या लाटा, महापूर, वादळे, दुष्काळ यासारख्या प्रलयकारी घटनांमध्ये वाढ होऊ लागली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार गेल्या दशकात जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत कोल्हापूरमध्ये 46 वेळा अतिवृष्टीची नोंद झाली. हवामान बदलामुळे अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. भविष्यात पर्जन्यवृष्टीचे दिवसमान कमी होऊन कमी वेळेत जादा पावसाचा धोका आहे.
गेल्या दशकात कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा आणि अतिवृष्टीचे प्रमाण वाढल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये कोल्हापूरमध्ये तब्बल 28 वेळा एका दिवसामध्ये 64.5 ते 115.5 मि.मी इतका तर 18 वेळा दिवसात 115.6 मि.मी पेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान सांगलीत सातवेळा, सातार्यामध्ये 48, रत्नागिरी 44 तर सिंधुदुर्गमध्ये 39 वेळा अतिवृष्टी झाली आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या तुलनेत हिंद महासागराचे तापमान वाढत आहे. या स्थितीला इंडियन ओशन डायपोल असे म्हटले जाते. याशिवाय बाष्पीभवनाचा वाढलेला वेग यामुळे येणार्या कालावधी मध्ये कमी वेळेत जास पाऊस होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
जून ते सप्टेंबर हा कालावधी पावसाचा असतो. मात्र, सध्या चित्र बदलत जात असून डिसेंबरपर्यंत अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये गेल्या दशकामध्ये तीनवेळा अतिवृष्टीची नोंद आहे. सांगलीमध्ये 2, सातारा 2, रत्नागिरी 4 तर सिंधुदुर्गमध्ये 3 वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे.