Latest

INDvsENG 5th Test : इंग्लंडविरुद्धच्या ५व्या कसोटीसाठी भारतीय संघात बदल! बीसीसीआयची घोषणा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्चपासून धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. केएल राहुल अद्याप उपलब्ध नाही, तर उपकर्णधार जसप्रीत बुमराह पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने संघाशी संबंधित अनेक अपडेट्स जारी केले आहेत. मोहम्मद शमीबाबतही बोर्डाने माहिती दिली आहे.

धर्मशाला येथील पाचव्या कसोटी सामन्यात केएल राहुल त्याचे खेळणे त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून होते. पण सध्या तो तंदुरुस्त नाही आणि उपचारासाठी लंडनला गेला आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे तो धर्मशाला येथे होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. केएल राहुलने मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला. यानंतर, क्वाड्रिसेप्स (पायाच्या) दुखापतीमुळे पुढील तीनही कसोटी सामन्यांत खेळू शकला नाही. (INDvsENG 5th Test)

त्याचवेळी जसप्रीत बुमराहला मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याने भरपूर गोलंदाजीसह चमकदार कामगिरी केली. अशा स्थितीत त्याला एका सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती, मात्र तो धर्मशाला कसोटीतून संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करेल. पहिल्या तीन सामन्यांनंतर बुमराह या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता, परंतु रांची येथील चौथ्या कसोटीत त्याला फिरकीपटू टॉम हार्टलीने मागे टाकले. बुमराहने 17 तर हार्टलेने 20 विकेट्स घेतल्या आहेत.

बीसीसीआयने वॉशिंग्टन सुंदरच्या संदर्भात एक अपडेट दिली आहे की त्याला संघातून रिलीज करण्यात आले आहे. तो कसोटी संघाचा भाग होता, पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत तो तामिळनाडूसाठी रणजी ट्रॉफी 2024 चा उपांत्य सामना खेळताना दिसणार आहे, जो 2 मार्चपासून मुंबईविरुद्ध खेळवला जाईल. रणजी ट्रॉफीची उपांत्य फेरी खेळल्यानंतर तो कसोटी संघात सामील होऊ शकतो. संघाला गरज असेल तरच हे होईल. (INDvsENG 5th Test)

शेवटच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिककल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाशदीप.

मोहम्मद शमीबाबत बोर्डाने माहिती दिली आहे की, त्याच्यावर 26 फेब्रुवारीला शस्त्रक्रिया झाली. त्याच्या उजव्या टाचेत समस्या होती. तो बरा होत असून लवकरच पुनर्वसनासाठी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणार आहे. मोहम्मद शमीने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता, परंतु त्यानंतर तो एकही सामना खेळला नाही आणि आता तो आयपीएल तसंच टी-20 विश्वचषकातून बाहेर पडणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT