पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 Schedule : आयपीएल 2024 च्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे दोन सामने आणि चार संघ प्रभावित झाले आहेत. बीसीसीआयने दोन मोठ्या सामन्यांच्या तारखा बदलल्या आहेत. मंगळवारी बोर्डाने दोन्ही सामन्यांचे नवे वेळापत्रक जाहीर केले. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचे सामने वेळापत्रकानुसार खेळवले जाणार नाहीत. केकेआर आणि राजस्थान यांच्यातील सामना आता एक दिवस आधी होणार आहे. गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना एक दिवस उशिराने रंगणार आहे.
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील साखळी फेरीतील सामना 17 एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर होणार होता, जो आता एक दिवस आधी म्हणजेच 16 एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे. राजस्थान संघ आपले पहिले तीन सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर श्रेयस अय्यरच्या कोलकात्यानेही सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले असून ते दुसऱ्या स्थानावर आहे. वेळापत्रकातील बदलाचा परिणाम केवळ राजस्थान आणि कोलकाता संघांवरच झाला नाही तर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांवरही झाला आहे. (IPL 2024 Schedule)
गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना 16 एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये होणार होता, मात्र केकेआर आणि राजस्थान यांच्यातील सामन्याच्या वेळापत्रकात बदल केल्यानंतर आता गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. म्हणजेच आता 17 एप्रिलला दोघांमध्ये लढत होणार आहे. (IPL 2024 Schedule)
वास्तविक, 17 एप्रिलला रामनवमी आहे आणि त्यामुळे सामन्याला सुरक्षा पुरवणे कठीण झाले होते. बीसीसीआय आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल हे सातत्याने कोलकाता पोलिसांच्या संपर्कात होते. त्यानंतर बोर्डाने कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील सामना एक दिवस आधी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.