कोल्हापूर, अनिल देशमुख : कोल्हापूरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) रोबोटिक अँड डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग टेक्निशियन, थ्रीडी प्रिंटिंग टेक्निशियन आणि मेकॅट्रॉनिक्स हे कोर्स सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासह जिल्ह्यातील गडहिंग्लज आणि मुरगूड येथील आयटीआयमध्येही नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
कमी मागणी असलेल्या, मागणी नसलेल्या तसेच कालबाह्य तंत्रज्ञानावरील आधारित व्यवसायाचे काही अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच सेवा व उत्पादन क्षेत्राची मागणी, प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांची वाढती संख्या याचा विचार करून काही नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात विविध अभ्यासक्रमांच्या तब्बल 652 तुकड्या बंद करण्यात आल्या, त्याचबरोबर नव्या 652 अभ्यासक्रमांच्या तुकड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापुरातील आयटीआयमध्ये तीन अभ्यासक्रमांच्या चार तुकड्यांचा समावेश आहे.
आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 'सूचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम' ही स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात आली होती. या स्पर्धेत 1 लाख 30 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून प्राप्त झालेल्या मागण्यांपैकी काही अभ्यासक्रमांचा आयटीआयमध्ये समावेश करण्यात आला आहे. वाढवण्यात आलेल्या 652 तुकड्यांमुळे राज्यातील 419 आयटीआयमध्ये उपलब्ध 6 हजार 701 पदांवर 6 हजार 701 तुकड्या सुरू होणार असून, राज्याची प्रवेश क्षमता 10 हजार 756 इतकी वाढणार आहे.
कोल्हापूरच्या आयटीआयमध्ये आता 103 तुकड्यांऐवजी 107 तुकड्या होणार असून, एकूण 2 हजार 184 प्रवेश क्षमता वाढून ती 2 हजार 272 इतकी होणार आहे. गडहिंग्लज आयटीआयमध्ये 20 तुकड्या आता 25 करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 424 असणारी प्रवेश क्षमता 540 वर गेली आहे. मुरगूड आयटीआयमध्ये 11 तुकड्या वाढवून आता 12 केल्या आहेत. त्यामुळे 228 प्रवेश क्षमता 248 इतकी वाढणार आहे. गडहिंग्लजमध्ये सर्व्हेअर, प्लंबर, वायरमन, कॉस्मेटॉलॉजी, तर मुरगूड आयटीआयमध्ये पेंटर कोर्स सुरू होणार आहे. गगनबावडा आणि शाहूवाडीतील प्रत्येकी एक तुकडी कमी करण्यात आली आहे.