Latest

Coronavirus Updates | देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच, २४ तासांत ६ हजार नवे रुग्ण

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत ६,०५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या २८,३०३ वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण ०.०६ टक्के एवढे आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७५ टक्के आहे. गेल्या २४ तासांत ३,३२० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दर दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ३.३९ टक्क्यांवर गेला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३.०२ टक्के आहे, असे आरोग्य मंत्रालयाने नमूद केले आहे.

याआधी गुरुवारी दिवशी देशात कोरोनाचे ५,३३५ रुग्ण आढळून आले होते. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी रुग्णसंख्येत २० टक्क्यांची वाढ दिसून आली होती. केरळ, दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील रुग्णसंख्येत अधिक वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात (३० मार्च- ५ एप्रिल) दरम्यान २६,३६१ रुग्णांची नोंद झाली होती. याआधीच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १३,२७४ एवढी होती. याचाच अर्थ गेल्या आठवड्यात रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाली आहे. (Coronavirus Updates)

महाराष्ट्रातही चिंता वाढली

महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ८०० वर पोहोचली. तर तिघांचा मृत्यू झाला. यात मुंबई, ठाणे आणि जालन्याली प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील ही रुग्णसंख्या ऑक्टोबर नंतरची सर्वांधिक आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी रुग्णसंख्येत ४१ टक्क्यांची वाढ दिसून आली. मुंबईत १९ नवे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले असून एकूण दाखल रुग्णांची संख्या १०० वर पोहोचली आहे.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आज बैठक

केंद्राने कोविड १९ संदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नियमितपणे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांतील स्थितीचा आढावा घेतला आहे. आज, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मांडविया राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. (Coronavirus Updates)

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT