Latest

कोरोनाची चौथी लाट येणार नाही; डॉ. गिलाडा यांचे मत

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  कोरोना रुग्णवाढ आणि कोरोनाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले असले तरी काळजी करण्यासारखी स्थिती नाही, असे मत संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. ईश्वर गिलाडा यांनी व्यक्त केले. कोव्हिड एन्डीमिक या स्थितीत आपण पोहोचलो आहोत. कोरोनाची चौथी लाट येईल असे मला वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या २४ तासांत देशात ७६३३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. सक्रीय रुग्णसंख्या ६१,२३३ वर पोहोचली आहे… गेल्या सहा आठवड्यांपूर्वी देशात दररोज केवळ १०० रुग्णांची नोंद करण्यात येत होती. या तुलनेत गेल्या आठवड्यात दररोज १० हजार कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. या दरम्यानच्या आठवड्यांचा विचार केला तर प्रत्येक आठवड्यात ७९ टक्के रुग्णवाढ दिसून येते.
डॉ. गिलाडा म्हणाले, की सध्या झपाट्याने रुग्णवाढ होत आहे. मे महिन्याच्या अखेरीस एक लाख रुग्ण आढळून येण्याची शक्यता आहे. परंतु, तरीही मी कोरोनाच्या या वाढीला कोरोनाची लाट असे म्हणणार नाही. सध्या मृत्युमुखी पडत असलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण ६० वर्षांच्या वरचे आहेत. तसेच कोमॉर्बिटीज, डायबिटिज, रेनल प्रॉब्लेम, कर्करोगाचे रुग्ण, केमोथेरेपी रुग्ण आणि क्षयरोग रुग्ण यांचे प्रमाण जास्त आहे. आपण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ किंवा घट नोंदविण्यात येईल. कोरोना एन्डीमिकची ही लक्षणे आहेत. गेल्या १६ महिन्यांमध्ये नवीन व्हेरायंट आढळून आलेला नाही. भविष्यात कोरोनाची मोठी लाट येईल, असे मला वाटत नाही. तरीही आपण सावध राहिले पाहिजे.

मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलच्या संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अनिता मॅथ्यू यांनी सांगितले, की फ्लूप्रमाणे कोव्हिड आता एन्डीमीक झाला आहे. भविष्यात रुग्णांच्या संख्येत वाढ किंवा घट दिसेल. सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटरच्या इन्फेक्शस डिसिजचे सहसंचालक डॉ. वसंत नागवेकर म्हणाले, की सध्या आढळून येणारे बहुतांश कोरोना रुग्ण सौम्य आणि स्वतः पुरता प्रादुर्भाव मर्यादित असणारे आहेत. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळेही रुग्णवाढ होत आहे. परंतु, रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असलेल्या आणि ट्रान्सप्लांट रुग्णांना याचा धोका जास्त आहे.

SCROLL FOR NEXT