कोरोना संसर्गात घट, पण मृत्यू चिंताजनक; दिवसभरात १,७३३ जणांचा मृत्यू file photo
Latest

कोरोना संसर्गात घट, पण मृत्यू चिंताजनक; दिवसभरात १,७३३ जणांचा मृत्यू

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन डेस्क देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. पण मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ६१ हजार ३८६ नवे रुग्ण आढळून आले. तर १,७३३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २ लाख ८१ हजार १०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात १६ लाख २१ हजार ६०३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्याचा पॉझिटिव्हिटि रेट ९.२६ टक्क्यांवर आला आहे.

याआधीच्या दिवशीही देशात कोरोनाबाधितांची संख्या २ लाखांहून कमी आढळली होती. पंरतु, कोरोना मृत्यूच्या वाढत्या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी दिवसभरात १ लाख ६७ हजार ५९ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, १ हजार १९२ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, २ लाख ५४ हजार ७६ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. यापूर्वी १० जानेवारीला जवळपास १ लाख ९४ हजार दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद घेण्यात आली होती.

देशात १ फेब्रुवारी पर्यंत ७३ कोटी २४ लाख ३९ हजार ९८६ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर १ फेब्रुवारी रोजी एका दिवशी १७ लाख ४२ हजार ७९३ चाचण्या करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

गोव्यात मंगळवारी कोरोनाचे नवे ९१० रुग्ण आढळून आले. तर ६ जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा एकूण आकडा ३,६९९ वर पोहोचला आहे. गोव्यातील पॉझिटिव्हिटी रेट १९.५७ टक्के एवढा आहे. राज्यात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट ५७ देशांत आढळून आला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत १० आठवड्यापूर्वी ओमायक्रॉन व्हेरियंट आढळून आला होता. सध्या जगभरात तो वेगाने पसरत आहे.

मुंबईतील रुग्णसंख्येत घट होत आहे. मंगळवारी मुंबईतील दैंनदिन रुग्णसंख्या १५ हजारांच्या खाली आली. तर ७ जणांचा मृत्यू झाला. १८ जानेवारी नंतर पहिल्यांदा मृत्यूंचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात काल कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला. काल दिवसभरात ७१९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. त्यात १५४ जण बाधित आढळून आले, तर २७८ रुग्ण कोरोनातून बरे झाले. श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या अहेरी तालुक्यातील ७२ वर्षीय आणि उच्च रक्तदाब असलेला ७१ वर्षीय पुरुष तसेच मूत्रपिंडाचा आजार असलेल्या गडचिरोली तालुक्यातील २८ वर्षीय युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT