कोल्हापूर; राजेंद्र जोशी : कोरोनापासून निर्माण होणारा गंभीर आजार आणि रुग्णालयीन उपचारांपासून दूर राहण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. राज्यात गेल्या दीड महिन्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये झालेल्या कोरोना मृत्यूंत तब्बल 68 टक्के जणांनी लसीचा एकही डोस घेतला नव्हता, असे चित्र पुढे आले आहे. उर्वरित 32 टक्के रुग्णांपैकी काही रुग्णांनी लसीचा एक डोस, तर काही रुग्णांनी आजार अंगावर मोठ्या प्रमाणात बळावल्यानंतर उशिरा रुग्णालयात प्रवेश केल्यामुळे त्यांचा मृत्यू ( corona death ) झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये राज्यातील 19 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये 1 डिसेंबर 2021 ते 17 जानेवारी 2022 या कालावधीत कोरोनामुळे मृत्युमुखी ( corona death ) पडलेल्या रुग्णांच्या कारणांची मीमांसा केली आहे. या कालावधीत संबंधित रुग्णालयांमध्ये एकत्रित 151 रुग्ण कोरोनामुळे दगावल्याची नोंद आहे. यापैकी 101 रुग्णांनी कोरोनाच्या लसीचा एकही डोस घेतला नव्हता, तर उर्वरित 49 रुग्णांपैकी काहींनी रोगावर वेळेत उपचारासाठी वैद्यकीय उपचारांचा आधार न घेता रोग अंगावर बळावल्यानंतर उशिरा रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे उपचार करणार्या वैद्यकीय अधिकार्यांचे म्हणणे आहे. यामुळे कोरोनावरील लसीकरणाच्या मोहिमेत मागे राहिलेल्या नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घेण्याची गरज आहे.
देशाच्या पातळीवर लसीच्या 150 कोटी डोसेसचा टप्पा पार पडला असला, तरी अद्यापही मोठी लोकसंख्या संपूर्ण लसीकरणाच्या परिघाबाहेर आहे. या लसीकरण न करून घेतलेल्या नागरिकांना कायद्याने सक्ती करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयात अलीकडेच या विषयावर झालेल्या एका याचिकेच्या सुनावणीत केंद्र सरकारने लसीकरणाविषयी सक्ती करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने सादर केलेला अहवाल लसीकरणाच्या गांभीर्याविषयी बोलका आहे. ( corona death )
कोरोनावरील लसीकरणाविषयी जगभरात शास्त्रज्ञांची मते प्रसिद्ध करणारे अनेक अहवाल उपलब्ध आहेत. त्यांच्या मते, लसीकरण न केलेले नागरिक स्वतःवर संकट ओढावून घेताहेत. शिवाय, त्यांच्यामुळे कोरोनाच्या ओमायक्रॉनसारख्या नवीन उत्परावर्तीत विषाणूंनाही जन्म देण्यास कारणीभूत ठरताहेत. याविषयी घेण्यात आलेल्या काही चाचण्यांमध्ये लसीकरण झालेले नागरिक विषाणूला वेगाने तोंड देऊ शकतात. तसेच विषाणूची उच्चत्तम पातळी गाठण्यापूर्वीच त्यांचा मुकाबला होत असल्याने आजार गंभीर होण्यापासून त्यांना संरक्षण मिळत असल्याचे निष्कर्ष आहेत.