Latest

पाटण येथील ‘ते’ वादग्रस्त शिल्प हटवले

स्वालिया न. शिकलगार

पाटण (सातारा) : पुढारी वृत्तसेवा – पाटण येथील एका विद्यालयामध्ये असलेले दादोजी कोंडदेव यांचे वादग्रस्त शिल्प हटवण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडचे पाटण तालुकाध्यक्ष नितीन भिसे-नाईक आणि पाटण शहराध्यक्ष गणेश जाधव यांनी हे शिल्प हटवण्याची मागणी संस्थेकडे केली होती. त्यानंतर संस्थेचे जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर यांनी पुढाकार घेऊन संबंधित शिल्प हटवल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाटणकर यांचे आभार मानण्यात आले असल्याची माहिती नितीन भिसे नाईक यांनी दिली.

याबाबत नितीन भिसे नाईक यांनी सांगितले की, दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु अथवा मार्गदर्शक असल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसल्याचा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या इतिहास संशोधक समितीने काही वर्षांपूर्वी दिला होता. त्यानंतर राज्य शासनाने दादोजी कोंडदेव यांच्या नावे असणारा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार रद्द केला होता, तसेच चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून संबंधित मजकूर वगळला होता. पुणे महापालिकेने देखील लालमहालातील जिजाऊ-बालशिवबा यांच्या सोन्याच्या फाळाने जमीन नांगरात असल्याच्या समूहशिल्पातूनही दादोजी कोंडदेव यांचे शिल्प हटवले होते.

त्यानंतर पाटण येथील एका विद्यालयात असलेल्या या शिल्पाबाबत संस्थेचे मुख्याध्यापक व अमरसिंह पाटणकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिल्प हटवण्याबाबत चर्चा केली होती. त्यांनीही आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला, असल्याचेही नितीन भिसे नाईक यांनी सांगितले.

दरम्यान, संबंधित शिल्प खूप जुने असून त्याला काही प्रमाणात चिरा पडल्या होत्या. त्यामुळे ते शिल्प तशा परिस्थितीमध्ये ठेवणे शक्य नसल्याने ते शिल्प हटवून त्या ठिकाणी संस्थेने संस्थेचा सिम्बॉल असलेले शिल्प उभारले असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

त्या विद्यालयात बालशिवबा आणि दादोजी कोंडदेव यांचे सोन्याच्या फाळाने जमीन नांगरत असतानाचे समूहशिल्प होते. संभाजी ब्रिगेडने हे वादग्रस्त शिल्प हटवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. संस्थेच्या संचालक मंडळाशी चर्चा केल्यानंतर संचालक मंडळाने हे शिल्प हटवण्याचा निर्णय घेतला, असेही नितीन भिसे नाईक यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT