सांगवी; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील शिरवली व निरावागज बंधाऱ्याचा प्रश्न दूषित पाण्यामुळे ऐरणीवर आला आहे. या दोन्ही बंधाऱ्यांतील चांगल्या पाण्यात फलटण तालुक्यातील खासगी व सहकारी प्रकल्पांतील रसायनमिश्रित सांडपाणी मिसळत आहे. या दूषित पाण्यामुळे निरा नदीकाठचे ग्रामस्थ नरकयातना भोगत आहेत.
या गंभीर प्रश्नावर वारंवार चर्चा केली जात असताना शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची जाणीवपूर्वक डोळेझाक होत असल्याचा आरोप नदीकाठच्या गावांतील शेतकन्यांमधून होतो आहे. सध्या दोन्ही बंधाऱ्यांतील दूषित असून मोठ्या प्रमाणावर परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रसायनमिश्रित पाण्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर एखादा विषारी वायू निर्माण होऊन एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरवर्षी निरा नदीवरील बंधाऱ्यात पाणी अडविले की फलटण तालुक्यातील खासगी व सहकारी प्रकल्पांतील रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडले जाते. खासगी दूध प्रकल्प, सहकारी साखर कारखाने, कत्तलखान्यातील कत्तल केलेल्या जनावरांचे रक्त व रसायनमिश्रित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट ओढ्यावाटे निरा नदीवरील बंधायात मिसळून चांगल्या पाण्याचे प्रदूषण होत असते. वारंवार या गंभीर प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केली जात असताना शासकीय अधिकारी व पदाधिकारी काणाडोळा करीत असल्याचा आरोप सर्वच स्तरांतून होतो आहे.
शिरवली बंधाऱ्यात होणाऱ्या प्रदूषणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी त्यांनी प्रशासकीय पातळीवर पत्रव्यवहार करा, मग मी पुढचं बघतो अशा सूचना दिल्या होत्या.
सांगवी ग्रामपंचायतीच्या वतीने पुणे व सातारा येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाला लेखी पत्रव्यवहार केला आहे. तसेच किरण तावरे यांनीही पुणे येथील प्रदूषण मंडळाला समक्ष भेटून तक्रार केली होती. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.