Latest

‘सह्याद्री’त पट्टेरी वाघांची डरकाळी घुमणार

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  सह्याद्रीच्या डोंगररांगांत पट्टेरी वाघांचा अधिवास नसल्याने येथे वाघांचे संवर्धन केले जाणार आहे. त्या द़ृष्टिकोनातून विदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सहा वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करण्यात येणार आहे. वाघांच्या स्थलांतरासाठी वन विभागाने राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. ही परवानगी मिळण्याची शक्यता असून, लवकरच सह्याद्रीच्या डोंगरकपार्‍यांत बिबट्यांच्या जोडीने ताडोबातील वाघांची भटकंती आढळणार आहे.

राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा, सह्याद्री आणि ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत एकूण वाघांची संख्या 444 इतकी आहे; तर एकट्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 230 वाघ आहेत. परंतु, सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पात वाघांची नोंद दिसून आलेली नाही. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे. सातारा जिल्ह्यात असलेले कोयना अभयारण्य व शेजारच्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विस्तारलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून हा व्याघ्र प्रकल्प निर्माण झाला आहे.

चंद्रपूर, ताडोबामध्ये वाघांची संख्या खूपच वाढल्याने जंगलातून लगतच्या निवासी वस्त्यांमध्ये, गावांमध्ये वाघ येत आहेत. अन्नासाठी शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांना भक्ष्य करत आहेत. त्यामुळे वाघांची संख्या कमी करण्याचा निर्णय वन मंत्रालयाने घेतला आहे.
आणखी 27 वाघ राहू शकतात

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील जवळपास 29 गावांचे पुनर्वसनासाठी स्थानांतरण झाले आहे. गेल्या चार वर्षांच्या अभ्यासात येथील भक्ष्य प्राण्यांची संख्याही सातत्याने वाढत आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या एकूण क्षेत्राच्या 451 चौ.कि. क्षेत्र वाघाच्या अधिवासाच्या द़ृष्टीने अधिक योग्य आहे. या क्षेत्रात भक्ष्यांची उपलब्धता पाहता या प्रकल्पात अजून 12 ते 27 वाघ राहू शकतात, असे डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने केलेल्या अभ्यासात नमूद केले आहे.

SCROLL FOR NEXT