Latest

काँग्रेसला पाच जागांवर सोडावे लागणार पाणी

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील लोकसभेच्या काही जागा काँग्रेससाठी महत्त्वाच्या असल्या तरी सबुरीने घ्या. इंडिया आघाडीला धक्का बसेल, या स्तरावर जागांसाठी ताणू नका, असे आदेश काँग्रेस हाय कमांडने राज्यातील नेत्यांना दिले आहेत. त्यामुळे सांगली, भिवंडीसह मुंबईतील जागांबाबतचा नाद काँग्रेस सोडून देणार असल्याचे कळते.

लोकसभेच्या जागावाटपात काही निवडून येणार्‍या जागा ठाकरे गट आणि शरद पवार गटाने घेतल्याने काँग्रेसमध्ये असंतोष आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांत मोठी फूट पडलेली असतानाही जागावाटपात त्यांनी काँग्रेसवर कुरघोडी केली. हे दोन पक्ष जवळपास 32 जागा लढविणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला 16 जागांच्या आसपास जागा येतील. त्यातही सांगली, भिवंडी, मुंबई दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, दक्षिण मुंबई या जागा ठाकरे गट आणि शरद पवार गटाने घेतल्या आहेत. याबाबत काँग्रेस हाय कमांडकडे तक्रार करण्यात आली आहे. पण भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडी महत्त्वाची आहे. त्यामुळे जास्त ताणू नका, आघाडी एकसंध आहे हेच चित्र जनतेपर्यंत गेले पाहिजे, असा सल्ला राज्यातील नेत्यांना दिला आहे.

दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे हजर होते. तेव्हाही या नेत्यांनी, काँग्रेस हाय कमांडशी चर्चा केली आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत आता दिल्लीत बैठक होणार नाही. सांगलीत काँग्रेसचा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवू नये, असे उद्धव यांनी काँग्रेस हाय कमांडला सांगितले आहे. त्यामुळे सांगली ठाकरे गटच लढविणार हे निश्चित झाले आहे.

SCROLL FOR NEXT