Latest

राज्यात काँग्रेसला हव्यात 25 जागा

Arun Patil

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीत जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. दरम्यान, राज्यातील जागावाटपावरही आघाडीत खल सुरू आहे. काँग्रेसने या बाबतीत आघाडी घेतली आहे. विभागनिहाय आपण किती जागा जिंकू शकतो, यासंदर्भातला आढावा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला आहे. 25 हून अधिक लोकसभा क्षेत्रांमध्ये पक्ष ताकदीने लढू शकतो, लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पक्ष सज्ज असून पक्षाकडून आलेला आदेश अंतिम असेल, असे प्रदेश काँग्रेसने श्रेष्ठींना सांगितल्याचे समजते.

महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व विभागांमध्ये आपल्या पक्षाला कोणत्या जागा मिळू शकतात याबद्दल प्रदेश काँग्रेसने आपली भूमिका पक्षश्रेष्ठींना सांगितली आहे. विविध विभागांमध्ये विदर्भात काँग्रेस जास्त जागांवर दावा करण्याची शक्यता आहे. मात्र जागावाटपाबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो अंतिम असेल, अशी काँग्रेसची भूमिका आहे. दरम्यान, काँग्रेस पक्ष राज्यातील प्रमुख नेत्यांसह काही विद्यमान आमदारांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे.

वर्षभरापूर्वी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. तुलनेने काँग्रेस पक्ष एकसंध आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने त्यानंतर आता भारत जोडो न्याय यात्रेने काँग्रेस राज्यात चांगले कामगिरी करू शकेल, असा पक्षाला विश्वास आहे.

आघाडीतील पेच श्रेष्ठी सोडविणार

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत जाण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट गेल्यावेळी लढले तेवढ्या जागांचा आग्रह धरू शकतात. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि अन्य पक्षांना सोबत घ्यावे का, घेतल्यास त्यांना किती जागा सोडायच्या, असा मोठा पेच आघाडीसमोर असणार आहे. मात्र याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील. असा विश्वास काँग्रेसला आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात लोकांच्या अपेक्षा हव्यात

काँग्रेसचा जाहीरनामा हा लोकांचा जाहीरनामा असला पाहिजे, लोकांची मत आणि अपेक्षा या जाहीरनाम्यात असली पाहिजेत, असा प्राथमिक सूर काँग्रेसच्या जाहीरनामा समितीच्या पहिल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या नेतृत्वात काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. या समितीची पहिली बैठक आज काँग्रेस मुख्यालयात पार पडली.

SCROLL FOR NEXT