Latest

केंद्राकडून देशवासीयांच्या खिशावर डल्ला मारला जातोय : राहुल गांधी यांचा हल्लाबोल

अनुराधा कोरवी

रायपूर ः वृत्तसंस्था :  देशात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. केंद्र सरकारकडून लोकांचा खिसा कापला जात आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

भारत जोडो न्याय यात्रेप्रसंगी छत्तीसगडमधील कोरबा येथील रॅलीत ते बोलत होते. यावळी ते म्हणाले, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे. देशवासीयांची दिशाभूल केली जात आहे. महागाई वाढल्याने लोक हैराण झाले आहेत. देशात जातीनिहाय जनगणना करण्याची गरज आहे. यासाठी लोकांचा पाठिंबा घ्यायला हवा. दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांची लोकसंख्या 74 टक्क्यांवर आहे. देशातील 200 टॉप कंपन्यांना केंद्र सरकारकडून निधीचा पुरवठा केला जातो. मात्र, या दोनशे कंपन्यांतील एकाही कंपनीचा मालक मागासवर्गीय नाही.

हॉस्पिटल अथवा एखाद्या विद्यापीठाचा मालक दलित अथवा आदिवासी आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मोबाईलच्या व्यसनाच्या आहारी न जाण्याचे आवाहनही त्यांनी केले. मोबाईलमुळे आपले लक्ष विचलित केले जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. गरीब, बेरोजगार अथवा छोटे व्यावसायिक राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास उपस्थित नव्हते. अदानी, अंबानी, बच्चन यांसारखे मान्यवर उपस्थित होते. अदानी आणि अंबानी चिनी माल विकून पैसे मिळवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ज्यावेळी देशातील दहा लाख युवक सरकारला निधीबाबत जाब विचारतील, तेव्हा देशात भूकंप होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

'भारत जोडो' आठ दिवस आधीच आटोपणार

भारत जोडो न्याय यात्रा निर्धारित वेळेआधी आठ दिवस आधीच आटोपती घेण्यात येणार असल्यची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. उत्तर प्रदेशातील पश्चिम जिल्ह्यातील यात्रा रद्द करण्यात आल्याचे समजते. उत्तर प्रदेशनंतर भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात जाणार आहे.

SCROLL FOR NEXT