Latest

पीएम मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या काँग्रेस नेत्याला १४ दिवसांची कोठडी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले मध्य प्रदेशचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते राजा पटेरिया यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पटेरिया यांना आज (दि. 13) सकाळी पन्ना पोलिसांनी दमोह जिल्ह्यातील हटा येथून अटक केली होती. 'मोदींना मारण्यासाठी तयार राहा' या कथित विधानाच्या संदर्भात पन्ना येथील पवईमध्ये सोमवारी पटेरिया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, पीएम मोदींबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल मध्य प्रदेश काँग्रेसने पटेरिया यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी का करू नये, याबाबत त्यांना 15 दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी सोशल मीडियावर पटेरिया यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात ते काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करता म्हणतात की, 'मोदी निवडणूक संपवतील. मोदी धर्म, जात, भाषेच्या आधारावर (लोकांमध्ये) फूट पाडतील. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे भावी जीवन धोक्यात आले आहे. संविधान वाचवायचे असेल तर मोदींची हत्या करायला तयार रहा,' असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. हा कथित व्हिडिओ मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील पवई शहरातील आहे.

पटेरिया म्हणाले, देशाचे संविधान वाचवायचे असेल आणि आदिवासींचे रक्षण करायचे असेल तर मोदींना मारायला तयार व्हा. आपल्या देशाच्या राजकारणात आता सौहार्द आणि बंधुभावाचा संबंध राहिलेला नाही. आता राजकारणात बदला घेण्याची भावना उघडपणे दिसू लागली आहे. राजकीय भाषेची पातळी सातत्याने घसरत आहे. मोदी निवडणुका संपवून टाकतील. मोदी धर्म, भाषा आणि जातीच्या आधारावर विभाजन करतील. अल्पसंख्यांकांचे जीव धोक्यात आहे. संविधान वाचावायचे असेल तर मोदींची हत्या करायला तयार राहा. हत्या म्हणजे हरवण्याचे काम, असेही पटेरिया यांनी म्हटल्याचे व्हिडीओमधून समोर आले आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पटेरिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर काँग्रेस नेत्याचे स्पष्टकरीण पुढे आले आहे. 'माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय. मी मोदींचा पराभव करण्याबाबत बोलत होतो,' असे पटेरिया यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT