Latest

भाजप प्रतिवाद करायला आणि उत्तर द्यायला तयार नाही: बाळासाहेब थोरात

अमृता चौगुले

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: ज्या ठिकाणी वाद असतो, तेथे प्रतिवाद केलाच जातो. प्रतिवादला प्रत्येकाने उत्तर दिलेच पाहिजे. परंतु, भाजप मात्र प्रतिवाद करायला तयार होत नसल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना केली.

काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरात माध्यमांशी बोलताना सांगितले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष किमान समान कार्यक्रम हातात घेऊन एकत्र आलेलो आहे. प्रत्येक पक्षाचे मत आणि विचारधारा वेगवेगळी असू शकते. आमच्यात वाद प्रतिवाद होत असतात. मात्र, आम्ही येथून मागे किमान समान कार्यक्रमावर आधारित काम करत होतो आणि इथून पुढेही करत राहू असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध काय? हा प्रश्न उपस्थित केला असता याला भाजपने उत्तर द्यायला पाहिजे होते. मात्र त्याला उत्तर न देता त्यांचा थेट आवाजच कसा बंद करता येईल, यावरच भाजप जोर देत असल्याची टीका त्यांनी केली.

राज्यघटनेत सत्ताधारी आहे, तसा विरोधी पक्ष आहे. सत्ताधाऱ्यांचे काम जसे देश किंवा राज्य चालविणे असते. तसे कुठे चुकत असेल तर त्यावर बोट ठेवण्याचे काम विरोधकांचे असते. मात्र, विरोधक कोणी बोलले की लगेच त्यांचा आवाज कायमस्वरूपी बंद करायचा, असे प्रयत्न भाजपच्या नेत्यांचे सुरू झाले असल्याचा आरोपही थोरात यांनी यावेळी केला.

भाजप महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे का? यावर विचारले असता थोरात म्हणाले की, त्यांचा आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, तशी आमच्यात फूट पडणार नाही. आम्ही किमान समान कार्यक्रमावर आधारितच काम करत असल्याचे त्यांनी सांगितले

SCROLL FOR NEXT