Latest

उद्धव ठाकरेंना काँग्रेसकडून सोनिया भेटीचे निमंत्रण; वेणुगोपाल मातोश्रीवर

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सोमवारी रात्री शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींसह काँग्रेस नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीला यावे, असे निमंत्रण मी त्यांना दिले आहे. ठाकरे यांच्या दिल्ली भेटीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी नक्कीच मुंबईला येतील, असे वेणुगोपाल यांनी सांगितले.

विरोधी पक्षांच्या एकजुटीचा भाग म्हणून के.सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेसश्रेष्ठींचे दूत म्हणून सोमवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, मुंबई अध्यक्ष भाई जगताप उपस्थित होते. तर, ठाकरे गटाकडून स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांचे स्वागत केले.

महाराष्ट्र आणि देशातील राजकारणातील विरोधकांच्या एकीबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे वेणुगोपाल म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा निरोप घेऊन मी उद्धव यांना भेटायला आलो आहे. शिवसेनेसह विरोधी पक्षांना संपविण्याचे काम देशात सुरू आहे. लोकशाही संपविली जात आहे. या स्थितीत उद्धव ठाकरे कसा लढा देत आहेत याचे आपण साक्षीदार आहोत. काँग्रेस पक्ष ठामपणे त्यांच्यासोबत उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही विरोधात प्रत्येक विरोधी पक्षाला लढायचे आहे. याबाबत सर्व विरोधकांचे एकमत आहे. विरोधी पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहे. पण, लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येत आहोत, हाच या भेटीचा संदेश आहे, असे वेणुगोपाल म्हणाले.

भाजपा सत्ताभक्षक : उद्धव ठाकरे

आमच्या गाठीभेटी आता चालतच राहतील, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आम्ही जेव्हा मैत्री जपतो तेव्हा ती फक्त मैत्री राहत नाही तर एक नाते असते. भाजपासोबत आम्ही मैत्री जपली. पण त्यांना त्याची जाणीव राहिली नाही, असे सांगून उद्धव म्हणाले, नुसते विरोधी पक्षांचे समीकरण हा मुद्दा नाही. तर देशात 'मी' करण चालले आहे. त्याविरोधात आम्ही एकत्र येत आहोत. भाजपा हा आता 'सत्ता' भक्षक पक्ष बनला आहे. शिवसेना देशासाठी, लोकशाहीसाठी पूर्ण ताकदीने उतरली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

SCROLL FOR NEXT